वसईत ११ कोटींचे अमली पदार्थ जप्त; २२ किलो ८६५ ग्रॅम मालासह नायजेरियनला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:12 IST2025-04-08T13:12:15+5:302025-04-08T13:12:34+5:30
नायजेरियनसह बांगलादेशी नागरिकांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याविरोधात विशेष मोहिम हाती घेण्याची मागणी होत आहे.

वसईत ११ कोटींचे अमली पदार्थ जप्त; २२ किलो ८६५ ग्रॅम मालासह नायजेरियनला बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क, नासोपारा : एव्हरशाइन परिसरात ११ कोटी ५८ लाख ४१ हजार १०० रुपये किमतीचे २२ किलो ८६५ ग्रॅम मेफेड्रॉन व ४८ ग्रॅम कोकेन सापडले. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी एका नायजेरियनला अटक केल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी दिली. दरम्यान नायजेरियनसह बांगलादेशी नागरिकांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याविरोधात विशेष मोहिम हाती घेण्याची मागणी होत आहे.
५ एप्रिलला रात्री सव्वाबारा वाजता गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस हवालदार सचिन पाटील यांना एव्हरशाइन सिटी परिसरात व्हिक्टर नावाची व्यक्ती अमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी व्हिक्टर ओनुवाला उर्फ डाईक रेमंड (३७) याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून ४८ ग्रॅम कोकेन व त्याचा डाईक रेमंड या नावाचा बनावट पासपोर्ट मिळाला. आरोपीला तपासासाठी वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
विमानतळावर बांगलादेशी महिला ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अवैधरित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. साधना दास (२७) असे या महिलेचे नाव असून, तिला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याप्रकरणी सहार पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दास हिने २०२४मध्ये बंगळुरूच्या पासपोर्ट कार्यालयाला खोटे नाव, पत्ता तसेच चुकीची माहिती सादर करत गैरमार्गाने भारतीय पासपोर्ट मिळवला. त्यानंतर याच पासपोर्टच्या मदतीने तिने अद्याप तीन वेळा प्रवासही केला आहे. तसेच ६ एप्रिल रोजी ती मुंबईवरून ढाका (बांगलादेश) या ठिकाणी निघाली होती. मात्र, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला. कर्नाटकमधील हुबळी परिसरात असताना एका स्थानिक एजंटच्या मदतीने तिने भारतीय नागरिकत्त्वाच्या पुराव्याची कागदपत्रे मिळवली, असे तपासात उघड झाले आहे.
वाशी गावात राहणाऱ्या बांगलादेशीवर कारवाई
नवी मुंबई : वाशी पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इस्लाम (३४) असे त्याचे नाव असून, तो वाशीगाव परिसरात झोपडीमध्ये राहत होता. वाशी पोलिसांकडून संशयितांची झाडाझडती घेतली जात असताना तो मिळून आला.