कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालकाचे अपहरण करून त्याच्याकडील ७० लाख लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. २२ जुलै मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास डहाणू तालुक्यातील घोळ गावाजवळील पुलाजवळ लुटमारीचा प्रकार घडला. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मनीषकुमार गोठवाल (४७, रा. गुजरात) हे अहमदाबाद येथील एका व्यावसायिकाकडे वाहनचालकाचे काम करतात. सोमवार, २१ जुलैला त्यांना अहमदाबादहून मुंबईला ७० लाख रुपये घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार मनीषकुमार यांनी त्यांचा मित्र अक्षय कनूभाई पटेल यांना सोबत घेतले. अहमदाबादहून निघाल्यानंतर, पहाटे कासा पोलिस ठाणे हद्दीतील घोळ गावाजवळ अचानक दोन गाड्यांनी त्यांच्या कारचा रस्ता अडवला. चार हल्लेखोरांनी कारच्या काचा फोडून मनीषकुमार व अक्षय पटेल यांना जबरदस्तीने बाहेर ओढले. त्यांना मारहाण करून डोळ्यांना पट्टी बांधली आणि हात बांधून कारमध्ये बसवून स्वत: सोबत नेले.
तासभर फिरवून सोडलेअपहरणकर्त्यांनी मनीषकुमार, अक्षय यांना धमकावले. त्यांना तासभर कारमधून फिरवल्यानंतर मनोर-विक्रमगड रस्त्याजवळ सोडून दिले. त्यानंतर पहाटे ५ वा. मनीषकुमार, अक्षय यांनी चालत जाऊन मनोर जवळील हॉटेल गाठले आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली.
रोकडसह मोबाइल पळविलेपोलिसांना मनीषकुमारची कार सोमटा गावाजवळ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकाजवळ अपघातग्रस्त अवस्थेत आढळली. कारची पाहणी केली असता, त्यात ठेवलेले ७० लाखांची रोकड, दोन मोबाइल चोरीला गेल्याचे उघड झाले.