ड्रेनेजच्या कामांमुळे होतेय वाहतूककोंडी, ठाणे शहरातील समस्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 01:26 IST2020-10-29T01:26:00+5:302020-10-29T01:26:10+5:30
सध्या शहरातील चित्र पाहिल्यास कुठे ड्रेनेजच्या वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत, तर कुठे पावसाळ्यात पडलेले खड्डे जैसे थे आहेत. यामुळे विविध भागांत नेहमी वाहतूककोंडी दिसत आहे.

ड्रेनेजच्या कामांमुळे होतेय वाहतूककोंडी, ठाणे शहरातील समस्या
- अजित मांडके
ठाणे : कोरोनामुळे ठप्प झालेल्या शहरातील विविध कामांना आता सुरुवात झाली. परंतु, सध्या शहरातील चित्र पाहिल्यास कुठे ड्रेनेजच्या वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत, तर कुठे पावसाळ्यात पडलेले खड्डे जैसे थे आहेत. यामुळे विविध भागांत नेहमी वाहतूककोंडी दिसत आहे. यासह शहरातील कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर भागांसह वागळे इस्टेट आदी भागांनाही पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने शहरात कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे.
यंदा पाऊस मुबलक पडूनही शहरात पाणीसमस्या आहे. पावसाने उसंत न दिल्याने खड्डे बुजविणे शक्य झाले नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे शहरातील ड्रेनेजवाहिन्या टाकण्याचे काम थांबले होते. परंतु, आता ही कामेही सुरू झाली आहेत. या कामासाठी रस्ते खोदल्यामुळे कोंडीत भर पडत आहे.
दोन दिवसाआड पाणी
घोडबंदर, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, बाळकुम, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागांना मुबलक पाऊस होऊनही पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहराची तहान भागविण्यासाठी पालिकेने विविध प्राधिकरणांकडून वाढीव पाणी मागितले आहे. परंतु, अद्यापही ते मिळू शकलेले नाही. कळवा, मुंब्रा, दिव्यात तर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
उड्डाणपुलांवरही खड्डे
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडतात. यंदाही ठाणेकरांना यामुळे कोंडीबरोबर इतर समस्यांना सामोरे जावे लागले. पावसाळ्यानंतरही ते कमी झालेले नाही. तर, कुठे दुरुस्तीची कामे सुरू असल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. शहरातील प्रमुख उड्डाणपुलांवरदेखील खड्डे असल्याने चित्र कायम आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे.
कचऱ्याचे प्रमाण कमी
झोपडपट्टी भागात काही ठिकाणी कचरा आहे. परंतु, शहराच्या मध्यवर्ती भागात मात्र त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातही शहरात नुकताच स्वच्छता पंधरवडा झाल्याने या काळात आयुक्त रोज रस्त्यावर उतरत होते. त्यामुळे विविध भागांत स्वच्छता आहे. मार्केट परिसरातही साफसफाईची मोहीम सुरू असल्याने कुठेही कचऱ्याचे ढीग मात्र दिसत नाहीत.
मेट्रोच्या कामामुळे भर
तीनहातनाका, नितीन कंपनी, आनंदनगर चेकनाका, घोडबंदर उड्डाणपुलांच्या ठिकाणी तसेच शहरातील काही मध्यवर्ती भागांत आजही सकाळ किंवा सायंकाळच्या सुमारास वाहतूककोंडी होते. तीनहातनाका ते घोडबंदर भागात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू असल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसत आहे. त्यामुळे तीनहातनाक्यापासून वाहतूककोंडी सुरू होऊन ती घोडबंदर भागातही सायंकाळी अधिक दिसते.
ड्रेनेजची अडचण
दिवा, घोडबंदर, पातलीपाडा, कोलशेत, ढोकाळी, एअरफोर्सजवळील रस्ता, ब्रह्मांड, आझादनगर आदी भागांत कोरोनामुळे बंद असलेली ड्रेनेजवाहिन्या टाकण्याची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे रस्ते खोदल्याने वाहतुकीचा वेग येथे मंदावतो. दिव्यात त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे ड्रेनेजची कामे लवकरात लवकर व्हावीत, अशी मागणी होत आहे.
२५ वर्षे सत्ता असूनही शिवसेनेकडून उपेक्षा
ठामपात २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, या काळात शिवसेनेला महापालिकेचे हक्काचे धरण बांधता आलेले नाही. रस्ते सुधारता आलेली नाहीत किंवा कचरासमस्या सोडविण्यासाठी हक्काचे डम्पिंग ग्राउंंडही सुरू करता आलेले नाही. शहरात रस्त्यांचे जाळे वाढले, रस्ते मोठे झाले, मिसिंग लिंक विकसित झाल्या, मात्र वाहतूककोंडी काही केल्या सोडविता आलेली नाही.
पाणीसमस्या सोडविण्यासाठी विविध प्राधिकरणांकडे वाढीव पाणी मागितले आहे. त्यामुळे ही समस्या लवकरच सुटेल. कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ड्रेनेजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू झालेले आहे. खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठामपा हद्दीत पाच प्राधिकरणांचे रस्ते आहेत. त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.- डॉ. विपिन शर्मा, आयुक्त