ठाकुर्लीतील अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST2021-04-03T04:37:22+5:302021-04-03T04:37:22+5:30
डोंबिवली : ठाकुर्लीतील ९० फुटी आणि रेल्वे समांतर रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण वाढले असताना ठाकुर्लीतून डोंबिवलीकडे जाणाऱ्या म्हसोबा चौक ते ...

ठाकुर्लीतील अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण
डोंबिवली : ठाकुर्लीतील ९० फुटी आणि रेल्वे समांतर रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण वाढले असताना ठाकुर्लीतून डोंबिवलीकडे जाणाऱ्या म्हसोबा चौक ते हनुमान मंदिर याअंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. यात वाहनचालकांना वाहने चालविताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एखादा अपघात घडल्यावर केडीएमसी प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या ९० फुटी आणि समांतर रस्त्यावर विकासकामांसाठी खोदकामे झाल्यावर आता तेथे खडीकरण व डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे येथील खड्डेमय रस्त्यांमधून वाहनचालकांची लवकरच सुटका होणार आहे. मात्र, ठाकुर्लीतील म्हसोबा चौक ते हनुमान मंदिर दरम्यानचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केडीएमसीने हा रस्ता गेले वर्षभर दुरुस्त केलेला नाही. डांबराचे पॅच मारून मलमपट्टी केली जाते, परंतु येथील स्थानिक रहिवासी, दुकानदार तसेच बांधकामधारक रस्त्यावर धूळ बसत असल्याने तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पाणी मारतात. तर, काही जण पदपथ धुणे तसेच अन्य कारणास्तव पाणी रस्त्यावर टाकत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे रस्त्यावर खड्डे पडत असल्याचे बोलले जात आहे.
या रस्त्यासंदर्भात माजी नगरसेविका प्रमिला चौधरी म्हणाल्या, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मार्चमध्ये पत्रव्यवहार केला आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. दरम्यान, थेट आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला गेल्याने आता आयुक्त तरी यात लक्ष घालून तातडीने खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित विभागाला देतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एमआयडीसीप्रमाणे कारवाई करणार का?
पाणी रस्त्यावर टाकून रस्ता खराब करणाऱ्यांविरोधात मध्यंतरी डोंबिवली एमआयडीसीने पुढाकार घेत गुन्हे दाखल केले होते. अशी कारवाई महापालिका स्तरावर होणे अपेक्षित आहे. मात्र, खड्डे बुजविण्याबरोबरच रस्ते खराब करणाऱ्यांकडे मनपाचे होत असलेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.
------------------------------------------------------