चोरीच्या दुव्याने उघड झाले ठाण्यातील दुहेरी हत्याकांड
By जितेंद्र कालेकर | Updated: March 6, 2025 11:10 IST2025-03-06T11:09:26+5:302025-03-06T11:10:00+5:30
व्यसनातून वृद्ध दाम्पत्याची हत्या करणारे दोघे अटकेत

चोरीच्या दुव्याने उघड झाले ठाण्यातील दुहेरी हत्याकांड
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मानपाड्यातील रेंटलच्या इमारतीमध्ये राहणारे समशेर सिंग आणि मीना सिंग (६५) या वृद्ध दाम्पत्याचा खून झाला होता. सुरुवातीला हत्या की आत्महत्या असे या प्रकरणाचे गूढ होते. २५ दिवसांच्या तपासानंतर चितळसर पोलिसांना एक दुवा हाती लागला. त्याच इमारतीमधील निसार शेख (२७) याच्यावर खिडकीतून शिरून चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता. याआधारे पोलिसांनी निसार आणि त्याचा साथीदार रोहित उतेकर (२६) या दोघांना अटक केली आणि या हत्याकांडाचे गूढ उकलले.
दोस्ती इम्पेरिया इमारतीमधील १४ व्या मजल्यावरील एका सदनिकेत समशेर सिंग आणि मीना सिंग (६५) राहत होते. मीना या दूध विक्री करायच्या, तर त्यांचे पती समशेर सुरक्षारक्षक म्हणून नाेकरी करायचे. घटनेच्या दिवशी सिंग यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. संशय बळावल्याने शेजाऱ्यांनी अंबरनाथमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलाला बोलावून घेतले. ५ जानेवारी २०२४ रोजी घरात दोघांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळले. दोघांच्याही अंगावर जखमा नव्हत्या.
दोघांची आत्महत्या, हृदयविकाराचा झटका अशीही शक्यता वर्तविली गेली. गळा दाबून दोघांचीही हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. आईच्या कानातील सोन्याच्या रिंग नसल्याने दोघांचाही चोरीसाठी खून झाल्याचा संशय मुलगा सुधीर याने व्यक्त केला होता.
मोबाइल, बांगड्या चोरल्या
चौकशीत निसारने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वॉर्डबॉयचे काम करणाऱ्या रोहितचे नाव घेतले. रोहित निसार या दोघांनाही गांजाचे व्यसन होते. सिंग दाम्पत्याला लुटण्याची योजना रोहितने आखली. त्यानुसार सिंग यांच्या बाथरूमच्या खिडकीतून दोघांनी प्रवेश केला. चाेरी करताना जागे झालेल्या समशेर आणि मीना यांचा त्यांनी गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. मोबाइल, बांगड्या तसेच मीना यांच्या कानातील रिंग चोरल्याचे सांगितले.
वॉर्डबॉयने आणले मोजे
रोहितने हॉस्पिटलमधूनच हॅन्डग्लोव्हज आणले. बोटांचे ठसे उमटू नये, यासाठी दोघांनीही हे ग्लोव्हज घातले होते.
मिळाले १० हजारांचे बक्षीस
या हत्याकांडाचा महत्वाचा दुवा देणाऱ्या सावंत यांना सुरवाडे आणि गोडे यांनी दहा हजारांचे बक्षीस दिले. उपायुक्त जाधव यांनी टीमचे कौतुक केले.
सीसीटीव्हीचे फुटेज तपासले
पाेलिसांनी लिफ्टजवळील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात बाहेरून कोणीही इमारतीत आले नसल्याचे आढळले. तत्कालीन पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी निरीक्षक सर्जेराव कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सुरवडे यांच्याकडे तपास सोपविला. हवालदार अभिषेक सावंत आणि अंमलदार शैलेश भोसले यांनी २५ दिवस त्या भागात तपास केला. बिल्डिंग नंबर दोनमधील निसार १६ व्या मजल्यावरील रोहितकडे नेहमी जातो, अशी माहिती हवालदार सावंत यांना मिळाली. पोलिसांनी निसारला ताब्यात घेतले.