Dombivli turmeric case to be investigated; Complaint to CM | डोंबिवलीतील हळद प्रकरणाची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

डोंबिवलीतील हळद प्रकरणाची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कल्याण : कोरोनाची लागण रोखण्यासाठी सगळ्यात आधी सार्वजनिक स्वरूपातील कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहन सरकारने केले होते. मात्र डोंबिवलीतील एका हळद व लग्न सभारंभात अनेक लोक सहभागी झाले. त्यामध्ये लोकप्रतिनिधींही होते. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या डोंबिवलीत वाढली. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी मुख्यमंत्रीकडे ठाकरे यांच्याकडे टिष्ट्वटरद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हळद प्रकरणच डोंबिवलीतील कोरोना रुग्ण वाढण्यास कारणीभूत असल्याचे पालकमंत्र्यांनीही मान्य केले आहे.

कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. त्यामुळे शिंदे यांनी शुक्रवारी महापालिकेत बैठक घेऊन काही सूचना केल्या. या बैठकीनंतर शिंदे म्हणाले, ‘या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील जे कोणी दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांनी स्वत:हून पुढे येऊन त्यांची तपासणी करून घ्यावी. काही लक्षणे आढळल्यास उपचार घेऊन होम क्वॉरंटाइन होण्याचा सल्ला पाळावा.’

‘कोरोना रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील दोन रुग्णालयांशी महापालिका सामंजस्य करार तातडीने करणार आहे. कोरोना रोखण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व आयुक्तांना आहे. ते त्यांनी घ्यावेत. तसेच जिल्ह्यात एक कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे,’ असे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Dombivli turmeric case to be investigated; Complaint to CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.