उल्हासनगराती डॉल्फिन रस्त्याने घेतला मोकळा श्वास, पार्किंग केलेल्या गाड्यावर ७० हजाराची दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:32 IST2025-09-20T18:32:20+5:302025-09-20T18:32:37+5:30
डॉल्फिन रस्त्या प्रमाणे इतर रस्त्यावरील अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाईची मागणी होत आहे.

उल्हासनगराती डॉल्फिन रस्त्याने घेतला मोकळा श्वास, पार्किंग केलेल्या गाड्यावर ७० हजाराची दंडात्मक कारवाई
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील शांतीनगर ते डॉल्फिन रस्त्यावर अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर शुक्रवारी महापालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत ७० हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अजय साबळे यांनी दिली. डॉल्फिन रस्त्या प्रमाणे इतर रस्त्यावरील अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाईची मागणी होत आहे.
उल्हासनगरातील रस्त्याची फुटपाथ फेरीवाले व दुकानदारांना तर मुख्य रस्त्याच्या कडेला ट्रक, टेम्पो, कार अवैधपणे पार्किंग केल्या जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. वाहतूक पोलिसांनी अश्या वाहनावर कारवाई केल्यावर राजकीय हस्तक्षेप होत असून वाहतुक पोलिसांची टोईंग गाडी वारंवार बंद केली जाते. असा आरोप शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. तसेच महापालिका अतिक्रमण विभाग फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले व दुकानदारावर कारवाई सुरू करताच, कारवाईच्या निषेधार्थ व्यापारी रस्त्यावर येत असल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. या राजकीय व व्यापाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे शहराचा चेहरा विद्रुप होत असल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे.
भाजप व शिंदेसेना पदाधिकाऱ्याची शुक्रवारी आमदार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालयात शहर विकास कामे व समस्याबाबत बैठक झाली. बैठकीत चौधरी यांनी रस्ता अतिक्रमण व वाहतूक कोंडीची समस्या मांडून यातील राजकीय हस्तक्षेप टाळून वाहतूक कोंडी सोडवा. असे आवाहन चौधरी यांनी केले. चौधरी यांच्या मागणीनंतर महापालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस विभागानी शांतीनगर ते डॉल्फिन रस्त्यावरील अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर शुक्रवारी संयुक्त कारवाई करून ७० हजाराचा दंड वसूल केला. या कारवाईने रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून शहरातील इतर रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.