गर्भलिंग चिकित्सेला मौन समर्थन देऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 05:42 AM2019-03-03T05:42:06+5:302019-03-03T05:42:13+5:30

२०१२ साली राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात बीडच्या डॉ. मुंडे दाम्पत्याला न्यायालयाने दोषी धरून, दोघांनाही १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

Do not give silence support to fetal therapy | गर्भलिंग चिकित्सेला मौन समर्थन देऊ नका

गर्भलिंग चिकित्सेला मौन समर्थन देऊ नका

Next

- स्नेहा पावसकर 

२०१२ साली राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात बीडच्या डॉ. मुंडे दाम्पत्याला न्यायालयाने दोषी धरून, दोघांनाही १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणाची समूळ चौकशी करून त्यांच्याविरोधात ठोस पुरावे गोळा केले, ते बीडच्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी, डॉ. राठोड या सध्या आरोग्यसेवा, मुंबई मंडळ येथे उपसंचालकपदी कार्यरत आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत आणि सद्य परिस्थितीबाबत त्यांच्याशी केलेली ही बातचीत.
प्रश्न : मुंडे दाम्पत्याचा नेमका पर्दाफाश कसा केला होता?
उत्तर : मी १३ जून, २०१० रोजी परळी येथे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रुजू झाले. त्या वेळी मी तेथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून डॉ. मुंडे दाम्पत्याच्या गैरकृत्याबद्दल ऐकून होते. शिवाय सात-आठ स्त्री अर्भके तेथील नाल्यात सापडल्याची माहिती मिळाली. आम्ही मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये चौकशीला गेलो असता, सुरुवातीला आम्हाला काही जणांनी पळवून लावले. एकदा तर आम्हाला कोंडून ठेवण्याचाही प्रयत्न झाला. वर्षभरानंतर त्या डॉक्टरने एका महिलेचा गर्भपात केला आणि त्यात ती महिला मृत्यू पावली. त्यानंतर, मुंडे दाम्पत्यावर केस दाखल केली. हॉस्पिटलमध्ये गेलो, तर ते दोघेही फरार झाले होते. आम्ही हॉस्पिटलचा तपास केल्यावर आम्हाला एक गुप्त दरवाजा दिसला. आम्ही तो तोडला, तर आतमध्ये सुमारे १०० बेड होते. आम्हाला इतरही काही मशिन, रजिस्टर मिळाले. त्यात काही नोंदी आढळल्या, तेच पुरावे ठरले. आम्ही ते सर्व ताब्यात घेऊन त्याचे योग्य फायलिंग केले. शासन या प्रकरणात आमच्या पाठीशी होते, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही आम्ही त्यांना जामीन मिळू दिला नाही.
प्रश्न : ठाण्यात अशा प्रकारच्या काही घटना आढळल्या का?
उत्तर : डॉ. मुंडे दाम्पत्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणाने संपूर्ण मराठवाडा हादरला. त्यानंतर, साधारण २०१३ साली मी ठाण्यात रुजू झाले. गेली काही वर्षे मी ठाण्यात काम पाहते आहे. मात्र, ठाण्यात अशा प्रकारच्या केसेस मला आढळलेल्या नाहीत. अर्थात, गडचिरोली किंवा बीड या जिल्ह्यांच्या तुलनेत ठाण्याचे लिंगगुणोत्तर (सेक्स रेशिओ) चांगले आहे, तसेच साक्षरतेचे प्रमाणही चांगले असल्याने
लोक अशा घटना काळजीपूर्वक हाताळतात.
>गर्भपातप्रकरणी मानसिकता बदलण्याची गरज आहे का?
उत्तर : अर्थातच, मुंडेंच्या प्रकरणात आम्हाला लक्षात आले की, इतर डॉक्टरांना माहीत असूनही कोणीही याबाबत काहीच बोलत नव्हते किंवा पूर्वी बोलले नव्हते. आपले सहकारी, शेजारी, जवळपासची व्यक्ती एखादे चुकीचे कृत्य करत असेल, तर त्याबाबत मौन बाळगून आपण एक प्रकारे त्याला समर्थन देतो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात गैरवर्तन करणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला पाठीशी घालू नये. गर्भपात करणे हा गुन्हा आहे, याबाबत रुग्णांमध्ये जागृती केली पाहिजे.
ठाणे, पालघरमध्ये आरोग्यविषयक कोणता गंभीर प्रश्न आहे?
उत्तर : जिल्ह्यातील आरोग्यविषयक परिस्थितीचा आम्ही आढावा घेतो. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत महिलांमध्ये अ‍ॅनिमिया आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. मुलगा-मुलगी असा भेदभाव नसला, तरी मुली, महिलांच्या शारीरिक पोषणाबाबत जागरूकता दिसत नाही. त्यामुळे बालमृत्यू, तसेच गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आहे.
ठाण्यात शहापूर, मुरबाड
या ग्रामीण भागांत अ‍ॅनिमियाग्रस्त महिलांचे प्रमाण अधिक आहे.

Web Title: Do not give silence support to fetal therapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.