उल्हासनगर रिपाइंतील वाद चव्हाट्यावर, शहरजिल्हाध्यक्षांना डावलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:19 IST2021-09-04T19:19:15+5:302021-09-04T19:19:49+5:30
उपमहापौर भगवान भालेराव बैठकीला नसल्याने, निवडणुकीपूर्वी पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण.

उल्हासनगर रिपाइंतील वाद चव्हाट्यावर, शहरजिल्हाध्यक्षांना डावलले?
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणुकी पूर्वी निवड समितीची स्थापना करण्यासाठी रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बी बी मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बैठक झाली. मात्र शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव बैठकीला नसल्याने, निवडणुकीपूर्वी पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली.
उल्हासनगरात रिपाइंची ताकद चांगल्या प्रमाणात असून महापालिकेत पक्षाचे ३ नगरसेवक आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष व गटनेते भगवान भालेराव हे उपमहापौर असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम चालत असल्याचे चित्र शहरात आहे. महापालिकेच्या निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याने, पक्षाचे पदाधिकारी बी बी मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी बैठक होऊन, निवडणुकीपूर्वी निवड समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका निवडणुकीत पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बी.बी.मोरे म्हणाले. तसेच निवड समितीस पक्षप्रमुख व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याकडून मान्यता घेण्यात येईल. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रत्यक्षात पक्षाची जबाबदारी शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांच्याकडे दिल्याने, पक्ष प्रमुख आठवले निवड समितीला मान्यता देणार का? असा प्रश्न निर्माण झाला. तसेच पक्षातील वादावर काय निर्णय घेतात. याकडेही पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
शहर रिपाइंची जबाबदारी माझ्याकडे - भगवान भालेराव
शहरात रिपाइंची ताकद वाढविण्याची जबाबदारी शहराध्यक्ष म्हणून पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी माझ्याकडे दिली. अशी प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली. येत्या दोन दिवसात नव्या दमाची निवड समिती स्थापन करणार असून समितीला पक्षप्रमुख रामदास आठवले यांची मान्यता असणार आहे, असेही भालेराव म्हणाले.