रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:11 IST2025-08-06T12:10:52+5:302025-08-06T12:11:56+5:30
रूपेश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भाईंदर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मा सह अन्य ४- ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून बाकीचे आरोपी मात्र पसार झाले आहेत.

रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
मीरारोड - रेल्वेची कामे करणाऱ्या ३ मराठी भावंडांवर प्राणघातक करण्यात आल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून एका हल्लेखोरस अटक केली आहे.
भाईंदरच्या राई गावात राहणारे रूपेश पाटील, भूषण पाटील, नितेश पाटील हे आगरी समाजातील तिघे भाऊ मिळून रेल्वे व अन्य सरकारी कामे कंत्राटने घेतात. मंगळवारी सायंकाळी हे तिघे भाऊ, रूपेश यांचा मुलगा यश व सहकारी संकेत म्हात्रे हे भाईंदर पश्चिम धक्काजवळ रेल्वे अधिकारी यांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी तेथे रेल्वेचे कंत्राट घेणारा जयेश माजलकर सह महेश शेट्टी, राहुल शर्मा व त्यांचे अन्य ४- ५ साथीदार काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आले. माझ्या कंपनीला रेल्वेने बॉयकॉट केले असे लोकांना का खोटे का बोलत आहे? असं रूपेश यांनी जयेशला विचारणा केली. त्याचा राग येऊन जयेश, शेट्टी, शर्मा आणी अन्य साथीदार हे त्या सर्वांच्या अंगावर धावून धक्कबुक्की व मारहाण सुरु केली.
रूपेश यांना हृदयविकाराचा आजार असल्याने त्यांना वाचवण्यासाठी भूषण व नितेशमध्ये आले असता जयेश याने गाडीतील लोखंडी रॉड काढून भूषणच्या पायावर व डोक्यावर मारुन जखमी केले. महेश शेट्टी, शर्मा व अन्य साथीदार यांनी गाडीतून लोखंडी रॉड, लाकडी दांडे, चॉपर काढून रूपेश, भूषण, नितेश यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. नितेशच्या डोक्यावर रॉड मारला. जयेश व साथीदारांनी, आमच्या नादी लागल्यास घरी येवून जीव घेऊ अशी धमकी दिली. रक्तबंबाळ झालेले तिघे भाऊ हे जीव वाचवून गाडीतून निघून जात असताना गाडीवर हाताने व काठीने फटके मारले. त्यांनी पोलिसांना मदतीसाठी कॉल केला, मात्र जीवाच्या भीतीने तेथे न थांबता निघून गेले.
पोलिस त्यांना बॉम्बे मार्केट नाक्याजवळ भेटले. भूषण व नितेश यांच्या चेहरा, डोक्याला जखमा होऊन रक्त वाहत होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रूपेश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भाईंदर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मा सह अन्य ४- ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून बाकीचे आरोपी मात्र पसार झाले आहेत.
प्राणघातक हल्ला करून खंडणीचा बनाव
पाटील बंधूंवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर ते जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना हल्लेखोरांनी व्हिडिओ काढून सांगा किती खंडणी पाहिजे? अशी विचारणा करत व्हिडिओ बनवला. नंतर राहुल शर्मा हा पोलिस ठाण्यात जाऊन पाटील बंधूंवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.