प्रदूषणामुळे भिवंडीत वाढले क्षयाचे रूग्ण
By Admin | Updated: September 15, 2015 23:09 IST2015-09-15T23:09:51+5:302015-09-15T23:09:51+5:30
शहरातील कल्याणरोड परिसरांत मोठ्या संख्येंने मोती कारखाने असून त्यातून पसरणाऱ्या प्रदूषणांतून आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले असून नागरिकांच्या

प्रदूषणामुळे भिवंडीत वाढले क्षयाचे रूग्ण
- पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
शहरातील कल्याणरोड परिसरांत मोठ्या संख्येंने मोती कारखाने असून त्यातून पसरणाऱ्या प्रदूषणांतून आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले असून नागरिकांच्या जीवितास घातक बनलेले मोती कारखाने बंद करण्याची मागणी होत आहे.
शहरात कल्याणरोड परिसरांतील नवी वस्ती, बाबला कंपाऊण्ड, रावजीनगर, नारायण कंपाऊण्ड, गणेश सोसायटी, पाईपलाईन, शांतीनगर आदी परिसरांत मोठ्या संख्येने मोती कारखाने आहेत. त्यात प्लॅस्टीकच्या दाण्यापासून मणी तयार करतात. त्यावर कोटींग करून मोती रंग दिला जातो. त्यामुळे ते मोत्यासारखे चमकतात. या मोतीसारख्या दिसणाऱ्या मण्यांना मुंबईतील मार्केटमध्ये भरपूर मागणी असल्याने शहरांत शेकडोच्या संख्येने मोती कारखाने सुरू आहेत. दाट लोकवस्तीमध्ये ते असल्याने तेथे वापरण्यात येणाऱ्या घातक रासायनिक पदार्थांचे व द्रव्यांचे प्रदूषण या लोकवस्तीत पसरल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे. मण्यांवर कोटींग करताना होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेतून परिसरांत ते होते. त्यामुळे नागरिकांना चक्कर येणे, जीव गुदमरणे, फुफ्फुसाचे आजार व क्षयरोग असे आजार होत आहेत. नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करणारे प्रदूषण मोती कारखान्यापासून होते याची माहिती प्रदूषण विभाग व फॅक्टरी विभागास आहे. तरीदेखील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच प्रदूषण विभागाने अद्याप या कारखानदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे परिसरांतील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
प्लॅस्टीकच्या दाण्यापासून मणी बनविल्यानंतर त्यावर कोटींग करण्यासाठी इन्थोल क्लोराईड व मिथॉल क्लोराईड ही केमीकल वापरली जातात. त्यापासून लेमोनायटीस(फुफ्फुस सुकणे), टी.बी. (क्षयरोग)होतात. याबाबत लेखी तक्रारी देऊनही संबधित शासकीय अधिकारी कारवाईस टाळाटाळ करतात.
- मुकेश लांबोळे, तक्रारदार, डार्इंग प्रयोगशाळा इन्चार्ज