Discussion on Trident and Ambani in NCP's discussion after defeat | पराभवानंतरच्या चिंतन बैठकीत राष्ट्रवादीची ट्रम्प अन् अंबानींवर चर्चा

पराभवानंतरच्या चिंतन बैठकीत राष्ट्रवादीची ट्रम्प अन् अंबानींवर चर्चा

ठाणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांत काँगे्रस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील पक्षाचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या ठाणे ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ठाण्यातील एका शाळेच्या सभागृहात तीन दिवसांपूर्वी बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे मांडल्यावर माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी पराभवाची कारणमिमांसा करण्याऐवजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एकंदरीत राजकारण अन् उद्योगपती अनिल अंबानी यांची अधोगती का झाली, यावर भाष्य केल्याने सारेच कार्यकर्ते बुचकळ्यात पडले. अनेक नेत्यांनी ग्रामीण भागात पदाधिकारी म्हणून नेमलेल्या वशिल्याच्या तट्टूंची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

भिवंडीत मित्रपक्ष काँगे्रसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्यासह ठाणे मतदारसंघात आनंद परांजपे आणि कल्याण मतदारसंघात बाबाजी पाटील यांचा दारुण पराभव झाला. भिवंडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिवसा टावरेंचा प्रचार, तर रात्री कपिल पाटील यांचा पाहुणचार, असे धोरण अंगीकारल्याच्या तक्रारी होत्या. असाच प्रकार ठाणे आणि कल्याण मतदारसंघांतही झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या दोन बैठकांमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेऊन पराभवावर विचारमंथन केले. सोबतच विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देशही दिले.

पराभवाची कारणं जाणून न घेतल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड
जिल्ह्याचे नेते म्हणून गणेश नाईक यांनी तीन दिवसांपूर्वी ठाण्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी काय काम केले, कोणी गद्दारी केली, पक्षाचा पराभव कोणत्या कारणांमुळे झाला, मित्रपक्षांची भूमिका काय होती, यावर बोलण्याऐवजी फक्त इव्हीएमवर बोलण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली. या बैठकीत खरी कारणे, त्यांना सांगताच आली नाहीत. तरीही २३ कार्यकर्ते या बैठकीत बोलले. त्यानंतर गणेश नाईक हे गद्दारांची कानउघाडणी करून पराभवाची कारणमीमांसा करतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात घडले मात्र वेगळेच. गणेश नाईक यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकारण, त्यांच्या निर्णयांचे परिणाम, तसेच उद्योगपती अनिल अंबानी यांचे चांगले-वाईट निर्णय अन् त्यांच्या व्यवसायाच्या अधोगतीवर भाष्य केल्याने आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

Web Title: Discussion on Trident and Ambani in NCP's discussion after defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.