आपत्तीचा सामना करण्यासाठी ठामपाची यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST2021-05-26T04:40:16+5:302021-05-26T04:40:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मान्सूनचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या प्रत्येक आपत्तीचा सामना ...

आपत्तीचा सामना करण्यासाठी ठामपाची यंत्रणा सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मान्सूनचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या प्रत्येक आपत्तीचा सामना करण्यासाठी साधनसामग्री आदींसह इतर व्यवस्था चोख ठेवण्याची तयारी पालिकेने केली आहे. यासाठी बोटी, लाइफ जॅकेट व अन्य साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानुसार ठामपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागही सक्षम केला आहे. तेथे २४ तास कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी हॉटलाइन, टोल फ्री क्रमांक आदी सज्ज ठेवले आहेत. आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपद्धतीही तयार आहे. त्यानुसार शोध व बचाव कार्यासाठी बोट, जेसीबी, लाइफ जॅकेट आदी साहित्य घेण्यात आले आहे. तसेच १२ फायर इंजिन, पाच आपत्कालीन टेंडर, आठ वॉटर टेंडर, तीन जम्बो वॉटर टेंडर, आठ क्विक रिस्पॉन्स व्हेइकल, जीप, टर्न लेबर लॅडर आदींसह इतर व्यवस्था अग्निशमन विभागाने सज्ज ठेवली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडेही लाइफ जॅकेट १५, लाइफ बॉईज १५, रबरी बोट, प्रशिक्षित व सुटका गट चार, दोरखंड, आग विझविण्याचे यंत्र, आरडीएमसी जॅकेट आदी साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. एखाद्या वेळेस पावसाळ्यात मोठी आपत्ती झाली तर त्या वेळेस नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या १० व खासगी मालकीच्या १६ बोटी अशा एकूण २६ बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तर शहरात सहा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणाही बसविली आहे.
एखाद्या वेळेस आपत्ती ओढवल्यानंतर तेथील नागरिकांची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यासाठी १३ ठिकाणी रात्रनिवारे सज्ज ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन विभागासह ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकही सज्ज आहे. या पथकामध्ये एक अधिकारी आणि ३३ ठोक पगारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
---------
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. तसेच आवश्यक त्या बोटी, लाइफ जॅकेट आदींसह इतर साहित्यही उपलब्ध करून दिले आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा
------------