महापौरपदासाठी काँग्रेस तसेच कोणार्क आघाडीत थेट लढत; आज निवडणूक, घोडेबाजार जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 02:44 AM2019-12-05T02:44:46+5:302019-12-05T02:45:08+5:30

भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी १२ वाजता निवडणूक पार पडणार आहे.

Directly contesting the Congress and the Konark front for mayor; Election today, horse market loud | महापौरपदासाठी काँग्रेस तसेच कोणार्क आघाडीत थेट लढत; आज निवडणूक, घोडेबाजार जोरात

महापौरपदासाठी काँग्रेस तसेच कोणार्क आघाडीत थेट लढत; आज निवडणूक, घोडेबाजार जोरात

Next

- नितीन पंडित

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेत कोणार्क विकास आघाडीकडून काँग्रेसला सुरुंग लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, त्यामुळे काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असतानाही महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि कोणार्कमध्ये थेट लढत असून, त्यामुळे घोडेबाजारही जोरात सुरू आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी १२ वाजता निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महापौरपदासाठी काँग्रेसच्या रिषिका पप्पू राका, वैशाली मनोज म्हात्रे, कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा विलास पाटील, तर शिवसेनेच्या वंदना मनोज काटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसने रिषिका राका यांना मतदान करण्यासाठी पक्षाच्या नगरसेवकांना व्हिप जारी केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वैशाली म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शिवसेनेकडे फक्त १२ नगरसेवक असल्याने वंदना काटेकर यांचा महापौरपदावरचा दावा धूसर झाला आहे. त्यामुळे महापौरपदासाठी काँग्रेसच्या रिषिका राका व कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांच्यातच थेट लढत होणार आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे काही नगरसेवक कोणार्क विकास आघाडीच्या तंबूत दाखल झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणार्क विकास आघाडीकडून काँग्रेसच्या एका गटाला उपमहापौरपद देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून, या पदासाठी इम्रान वली मो. खान हे दावेदार मानले जात आहेत. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणार्कच्या गोटात गेलेल्या काँग्रेस नगरसेवकांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले तर, महापौरपदी काँग्रेसच्या रिषिका राका आणि उपमहापौरपदी मुख्तार
मोहंमद अली खान यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पालिका निवडणुकीत कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये युती झाली होती. युतीधर्म पाळत भाजपने यावेळी कोणार्क विकास आघाडीच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. महापालिकेत काँग्रेस व शिवसेना आघाडीची सत्ता आहे. महापालिकेत ९० नगरसेवक असून, त्यामध्ये काँग्रेसचे ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्क विकास आघाडी ४, समाजवादी पार्टी २, आरपीआय (एकतावादी) ४ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.
महापौर निवडणूक असल्याने पालिकेच्या प्रवेशद्वारावर खासगी बसमधून येणाºया नगरसेवकांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. नगरसेविकांच्या बदल्यात त्यांचे पतीराज पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमजा करून निवडणुकीत तोरा मिरवत असल्याचेही यानिमित्ताने दिसत आहे.

घोडेबाजारामुळे वाढली चुरस
महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने भिवंडीत नगरसेवकांचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याला लगाम घालण्यासाठी शासनाने सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे मत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेदेखील आपला ३० नगरसेवकांचा गट नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, भिवंडी महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेतले होते.
काँग्रेसने उपमहापौरपदाची माळ सेनेच्या गळ्यात घातली होती. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या काँग्रेसची बाजू मजबूत आहे. मात्र, घोडेबाजार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. ते समीकरणही भिवंडी महानगरपालिकेच्या या निवडणुकीत जुळवून आणण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Directly contesting the Congress and the Konark front for mayor; Election today, horse market loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.