दिघी-वाढवण बंदरसाठी प्रयत्न करणार - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 01:51 IST2021-02-22T01:51:02+5:302021-02-22T01:51:08+5:30
येत्या काळात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील औद्योगिकरण वाढविण्यावर भर दिला जाईल.

दिघी-वाढवण बंदरसाठी प्रयत्न करणार - शरद पवार
म्हसळा : कोकणाच्या विकासासाठी येथे बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील दिघी आणि पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील बंदरे पूर्ण व्हावीत, यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे सांगितले.
येत्या काळात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील औद्योगिकरण वाढविण्यावर भर दिला जाईल. मात्र येथे रसायनमुक्त कारखानदारी येईल, याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. पंचायत समिती, बॅ. ए. आर. अंतुले भवन आणि म्हसळा येथील विज्ञान महाविद्यालयाचे बॅ. ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय असे नामकरण करण्याचा कार्यक्रम कोकण उन्नती मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तेव्हा ते बोलत होते.
कोकणात मागास राहिलेल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा हवा तेवढा विकास होऊ शकला नाही. कोकण हे भाताचे कोठार आहे. येथे कृषी आणि मत्स्य व्यवसायाला मोठया प्रमाणात चालना मिळाली. आता येथे बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. कोकणातील दिघी बंदर आणि पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विकसित होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या घरी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत केंद्राच्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे पवार यांनी सांगितले. रेवस- रेडी रस्ता लवकरच विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरला जाईल, असेही ते म्हणाले.