धनगर समाजाने आत्मपरीक्षण करावे- महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 21:13 IST2017-10-31T21:13:29+5:302017-10-31T21:13:51+5:30
धनगर समाजाला आरक्षण हवे असेल तर त्यांनी आधी आत्मचिंतन करावे, कारण एक आमदार, एक खासदार हे पूर्ण समाजाचे नेतृत्व कसे करणार.

धनगर समाजाने आत्मपरीक्षण करावे- महादेव जानकर
डोंबिवली- धनगर समाजाला आरक्षण हवे असेल तर त्यांनी आधी आत्मचिंतन करावे, कारण एक आमदार, एक खासदार हे पूर्ण समाजाचे नेतृत्व कसे करणार. समाजाने समजून घ्यायला हवे. बारामतीत मला सगळ्यात कमी मत पडली, समाज त्याचा विचार का नाही करत? असा सवाल दुग्ध, आणि मत्स्योत्पादन मंत्री महादेव जानकर यांनी केला.
ते डोंबिवलीत वनराई प्रतिष्ठानच्या शेती प्रदर्शनाला भेट देण्यासाठी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की राज्य शासन धनगरांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे, पण समाजाची ताकद दिसत नाही. ती दिसणे आवश्यक आहे. मी केवळ एकटा धनगर समाजाचा नेता नसून मराठा समाजाचे गेली 34 वर्षे नेतृत्व करतोय. सबंध महाराष्ट्र् फिरतोय, सगळीकडे धनगर समाज दिसतो पण एकत्रीकरण कुठं नाही होत. सगळ्या ठिकाणी समाज विखुरला आहे. समजा राज्य शासनाने धनगर आरक्षण बिल पारित करून केंद्रात पाठवलं तर तिथं समाजाची बाजू मांडण्यासाठी खंबीर नेतृत्व आहे का? याचा विचार का केला जात नाही असेही ते म्हणाले.
त्यावेळी माजीमंत्री जगन्नाथ पाटील, आयोजक महेश पाटील, बंडू पाटील, तात्या माने, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे आदी उपस्थित होते.