जीवनवाहिनी सुरु होऊनही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, बरे होणाऱ्यांचे प्रमाण तीन हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 01:11 IST2021-02-14T01:10:23+5:302021-02-14T01:11:45+5:30
CoronaVirus News In Thane : सध्या उपनगरीय वाहतूक सर्वांसाठी खुली केली आ-हे. या दरम्यान सर्वसामान्य प्रवाशांना वेळेचे बंधन आहे. त्या कालावधीसह अन्यही वेळेत सेकंड क्लासच्या डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.

जीवनवाहिनी सुरु होऊनही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, बरे होणाऱ्यांचे प्रमाण तीन हजारांवर
- सुरेश लोखंडे
ठाणे : सर्वांसाठी उपनगरीय वाहतूक सुरू होऊन तब्बल बारा दिवस झाले. या दरम्यान कोरोनारुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या बारा दिवसांच्या कालावधीत रुग्णसंख्येचा चढ-उतार लक्षात घेऊन कमीत कमी २५ ते ५० रुग्णांची या कालावधीत वाढ झाली तर मृतांचे प्रमाण अत्यल्प आढळले. या कालावधीत बरे होणाऱ्यांचे प्रमाण
मात्र तीन हजारांपेक्षा जास्त आढळले आहे.
सध्या उपनगरीय वाहतूक सर्वांसाठी खुली केली आ-हे. या दरम्यान सर्वसामान्य प्रवाशांना वेळेचे बंधन आहे. त्या कालावधीसह अन्यही वेळेत सेकंड क्लासच्या डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा कधीच उडालेला पाहायला मिळत आहे. तरीदेखील रुग्णसंख्येचा दैनंदिन अहवाल लक्षात घेता बारा दिवसांच्या कालावधीत जास्तीत जास्त ५० रुग्णांची भर पडलेली दिसून येत आहे. यात सुरुवातीचे तीन दिवस २१५ ते २१६ या रुग्णसंख्येत अवघ्या एका रुग्णाची वाढ झालेली दिसून आली. तर त्यानंतरचे दोन दिवस ४० रुग्णांची वाढ आढळली. या लोकल प्रवासाच्या दरम्यान दोन दिवस ३०८ ते ३६४ रुग्णसंख्या दिसत असली तरी त्यात २५ ते ३० रुग्णांची वाढ झालेली होती. या चढ-उतार रुग्णसंख्येचा आलेख लक्षात घेता रुग्णसंख्येचे प्रमाण फारसे वाढले नसल्याचे उघड झाले आहे.
रुग्णसंख्येच्या या अल्प वाढीच्या आलेखाप्रमाणेच मृतांच्या आकडेवारीतही फारशी वाढ झालेली नाही. या कालावधीत सुरुवातीला एक ते दोन मृतांची वाढ होताना दिसून आली. ती आजपर्यंतही कमी प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनारुग्ण मृतांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनात आले आहे. याशिवाय बारा दिवसांत बऱ्या होणाऱ्यांची संख्या तीन हजार २२नी वाढली आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये दररोज २०० ते ३०० जणांची वाढ होताना दिसून आली.
सध्याच्या लोकल प्रवासादरम्यान मास्कची सक्ती केली जात असल्यामुळे तिचे पालन बऱ्यापैकी आहे. तर शहरांमध्येही मास्क वापरण्याची शिस्त असली तरी बहुधा ते दाढीला अडकलेले जास्त दिसून येतात. या बेशिस्तांवरील कारवाई सध्या मंदावली आहे. त्यामुळे शहरातील मास्क वापरण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नागरिक नियम बिनधास्त मोडत आहेत.
सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झालेली आहे. सध्या थंडीचा कालावधी असल्यामुळे सर्दी, पडशाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये सर्दी, पडसे वाढले आहे. वातावरणातील बदलामुळे हे रुग्ण वाढले आहेत. त्यास फारसे गांभीर्याने घेण्यासारखे वाटत नाही.
- डॉ. संतोष कदम,
अध्यक्ष आयएमए, ठाणे