लोकल धावूनही कोरोना नियंत्रणात , किंचित रुग्णवाढीबरोबरच बरे होणारेही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 00:01 IST2021-02-14T00:00:34+5:302021-02-14T00:01:17+5:30

Palghar : वसई-विरार वगळता १ ते १३ फेब्रुवारीदरम्यान पालघरमध्ये १०९ रुग्ण आढळले आहेत, तर वसई-विरारमध्ये याच कालावधीत १९० रुग्ण नव्याने आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Despite the local run, corona control, with a slight increase in morbidity, also increased recovery | लोकल धावूनही कोरोना नियंत्रणात , किंचित रुग्णवाढीबरोबरच बरे होणारेही वाढले

लोकल धावूनही कोरोना नियंत्रणात , किंचित रुग्णवाढीबरोबरच बरे होणारेही वाढले

- जगदीश भोवड/हितेन नाईक

पालघर : सरकारने मुंबईत  १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेसाठी का होईना, पण सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू केल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला असून अनेक जण आता नोकरीधंद्यानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत. त्याच वेळी कोरोना नियंत्रणात असल्याचेही आढळले आहे. दरम्यान, रुग्णांच्या संख्येत गेल्या १३ दिवसांत किंचित वाढ होत असतानाच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. वसई-विरार वगळता १ ते १३ फेब्रुवारीदरम्यान पालघरमध्ये १०९ रुग्ण आढळले आहेत, तर वसई-विरारमध्ये याच कालावधीत १९० रुग्ण नव्याने आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच जिल्ह्यामध्ये गेल्या १३ दिवसांत २९९ नवीन रुग्ण आढळले आहेत. 
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सध्या कोरोना नियंत्रणात आहे. शनिवारी वसई-विरारमध्ये २४, तर जिल्ह्याच्या अन्य भागांत १७ रुग्ण आढळले. मात्र पाच तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. पालघर तालुक्यामध्ये मात्र अद्यापही अधूनमधून रुग्ण आढळतच आहेत. त्याच वेळी वसई-विरारमध्येही नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या किंचित वाढताना दिसत आहे. पालघरसह सात तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत ८३ रुग्ण दाखल असून वसई-विरारमध्ये १७३ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
वसई-विरारमध्ये आजवर २९ हजार ९५६ रुग्ण आढळले असून दुर्दैवाने ८९४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, मात्र त्याच वेळी २८ हजार ८८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, वसई-विरारमध्ये गेल्या १३ दिवसांत २५० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर पालघरसह सात तालुक्यांमध्ये आजवर १५ हजार ५३५ रुग्ण आढ‌ळले असून ३०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १५ हजार १४८ रुग्ण या जीवघेण्या आजारातून बरे झाले आहेत.
एका परिसरातून दुसरीकडे जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच लोकलमधील गर्दीमुळे शारीरिक अंतर कमी झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा काही प्रमाणात वाढू लागली आहे, असे बोलले जात आहे. तसेच मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. 
पालघर जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण चांगले असून राज्यात पहिल्या तीन क्रमांकात पालघर जिल्हा आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन आठवड्यांत वातावरणात सतत बदल होत आहेत. त्यातून ताप, सर्दी-खोकला, अंगदुखीच्या रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे, असे डाॅक्टरांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण फार वाढले नसले तरी आम्ही सतर्क आहोत. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. तसेच सध्या ताप, सर्दी, खोकला हे आजार बदलत्या हवामानामुळे निर्माण झाले असून साथीच्या आजाराचा कुठलाही धोका नाही. याचा कोरोनाशी काही संबंध नाही.
- डॉ. अनिल थोरात,
जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर

Web Title: Despite the local run, corona control, with a slight increase in morbidity, also increased recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.