“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 06:16 IST2025-10-23T06:15:41+5:302025-10-23T06:16:16+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा ध्वज फडकणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) प्रतिबंध लादण्याचे प्रयत्न निंदनीय असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे सांगितले. काँग्रेसतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रातून 'आरएसएस'वर बंदी घालण्याची मागणी केली होती.
दिवाळीनिमित्ताने बुधवारी ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संघाने नेहमीच मजबूत राष्ट्रवादी प्रतिष्ठा आणि सार्वजनिक सेवेतली बांधिलकी जोपासली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट्टर देशभक्त आणि राष्ट्रवादी संघटन आहे. जेव्हा देश संकटात असतो, तेव्हा आरएसएस नेहमी मदतीसाठी पुढे येतो, असे शिंदे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये सरकारने रस्त्यांवर पदयात्रा काढणे आणि सार्वजनिक स्थळे तसेच सरकारी परिसरात कार्यक्रम आयोजित करण्याच्या संदर्भात 'आरएसएस'वर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून 'आरएसएस'वर बंदी घालण्याची मागणी केली होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकणार
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत शिंदे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील महायुती ही निवडणूक जिंकेल. भाजपव्यतिरिक्त महायुतीमध्ये शिंदेसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहकारी पक्ष आहे. त्यांनी पुढे सांगितले की, महायुतीने लोकसभा निवडणूक जिंकली आणि विधानसभा निवडणुकीतही मोठे बहुमत मिळविले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही महायुतीचा भगव्या ध्वज फडकेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंबई महापालिका वगळता इतर सर्व ठिकाणी महायुतीबाबत तीनही घटक पक्ष सकारात्मक असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.