माजी आमदारांचे हॉटेल पाडून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचे पालिका आयुक्तांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 11:54 PM2020-10-31T23:54:17+5:302020-10-31T23:54:46+5:30

Jitendra Awhad : माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत मी आवाज उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो की, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सीएन रॉक हॉटेलवर कारवाई करा.

Demolish former MLA's hotel, Jitendra Awhad's challenge to Municipal Commissioner | माजी आमदारांचे हॉटेल पाडून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचे पालिका आयुक्तांना आव्हान

माजी आमदारांचे हॉटेल पाडून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचे पालिका आयुक्तांना आव्हान

Next

मीरा राेड : आयुक्त डॉ. विजय राठोड तुम्ही खूप प्रामाणिक व कर्तव्यकठोर आहात, तर माजी आमदाराचा क्लब व हॉटेल तोडून दाखवा. आमच्या कार्यकर्त्याचे हॉटेल बेकायदा म्हणून कुणाला खूश करण्यासाठी तीन वेळा तोडले. मी १२४ बेकायदा हॉटेलांची यादी जाहीर करतो, त्यातील २४ हॉटेल तरी तोडायची तरी हिंमत दाखवा, असे थेट आव्हान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मीरा रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले.
माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत मी आवाज उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो की, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सीएन रॉक हॉटेलवर कारवाई करा. पालिकेतील अधिकारी एका पक्षाचे असल्यासारखे वागतात. कोण अधिकारी काय करतोय, किती वर्ष कुठल्या पदावर बसून आहे, कशात भ्रष्टाचार झाला आहे, याची संपूर्ण यादी आम्ही खिशात ठेवून फिरत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला, तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.
ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी, गेल्या पाचसात वर्षांत शहर विकासाच्या नावाखाली तत्कालीन आमदार नरेंद्र मेहतांनी स्वतःचा विकास केला. लोकांनी त्यांना अद्दल घडवून घरी बसवले. पण, आजही महापालिकेतील कार्यालये मेहता खाजगी कार्यालयासारखी वापरत आहेत, अशी टीका केली. मेळाव्यास संतोष पेंडुरकर, संतोष धुवाळी, अरुण कदम, मोहन पाटील, साजिद पटेल आदी उपस्थित होते.

रस्त्यांच्या कामांची चौकशी करणार
शहरातील काँक्रिट रस्त्यांचे कंत्राट कोट्यवधींनी वाढवून दिले असतानाच कामे रखडली आणि ती निकृष्ट असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी मांडली. हा प्रकार ऐकून आव्हाड यांनी, यात १०० टक्के भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही स्थानिक आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना याच्या तक्रारी करा. माझ्याकडेही प्रत द्या. या कामांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

Web Title: Demolish former MLA's hotel, Jitendra Awhad's challenge to Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.