रुग्णालय समोरच रुग्णवाहिकेत आदिवासी महिलेची प्रसूती; उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 22:40 IST2022-04-27T22:36:11+5:302022-04-27T22:40:06+5:30
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड व ग्रामीण परिसरातून असंख्य नागरिक व आदिवासी उपचार करण्यासाठी येतात.

रुग्णालय समोरच रुग्णवाहिकेत आदिवासी महिलेची प्रसूती; उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील प्रकार
- सदानंद नाईक
उल्हासनगर : मुरबाड येथील आदिवासी भागातून मंगळवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजता १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने आलेल्या महिलेला मध्यवर्ती रुग्णालया समोरच प्रसूती वेदना असह्य झाल्या. अखेर रुग्णवाहिके सोबत असलेल्या डॉक्टरांनी रुग्णवाहिकेत महिलेची सुखरूप प्रसूती केल्याची घटना घडली असून बाळाची तब्येत ठणठणीत आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड व ग्रामीण परिसरातून असंख्य नागरिक व आदिवासी उपचार करण्यासाठी येतात. मंगळवारी मुरबाड परिसरातील चिरड गावातील वैशाली बाळू मुकणे या आदिवासी महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने, महिलेला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात मध्यरात्री सव्वा दोन वाजता आणण्यात आले. त्यावेळी महिलेला प्रसूती वेदना असह्य झाल्या. मात्र वेळेवर डॉक्टर व वॉर्डबॉय आला नसल्याने, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर रमेश गंगाधरे यांनी महिलेची प्रसूती वेदना पाहून रुग्णवाहिका चालकाला एका बाजूला घेण्यास सांगितले. तसेच महिलेची प्रसूती रुग्णवाहिकेतच यशस्वीरित्या पार पडली. महिलेने पुत्ररत्नाला जन्म दिला.
१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे डॉ गंगाधरे हे देवदूता सारखे धावून आल्याने, त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तसेच आदिवासी रुग्णा सोबत असलेल्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची सुविधा रुग्णालयाकडून मिळत नसल्याने, आदिवासी परिसरातुन आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक नातेवाईक पैशे नसल्याने उपाशीपोटी राहत असल्याचे चित्र रुग्णालय परिसरात आहे. मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी आदिवासी महिलेची प्रसूती रुग्णवाहिकेत मध्यवर्ती रुग्णालय समोर झालेंच्या घटनेला होकार दिला. तसेच महिलेवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.