मीरा भाईंदर महापालिकेच्या शेवटच्या महासभेत वादावादी, कौतुक अन् अभिनंदनही; रविवारपासून सर्व नगरसेवक ठरणार माजी
By धीरज परब | Updated: August 27, 2022 20:54 IST2022-08-27T20:51:51+5:302022-08-27T20:54:02+5:30
पालिकेच्या शेवटच्या महासभेत महापौरांसह अनेक नगरसेवक भावुक झाले मात्र वादावादी, कौतुक आणि अभिनंदन अशा वातावरणात महासभा पार पडली.

मीरा भाईंदर महापालिकेच्या शेवटच्या महासभेत वादावादी, कौतुक अन् अभिनंदनही; रविवारपासून सर्व नगरसेवक ठरणार माजी
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील सध्याचे सर्व नगरसेवक रविवारपासून माजी नगरसेवक ठरणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या शेवटच्या महासभेत महापौरांसह अनेक नगरसेवक भावुक झाले मात्र वादावादी, कौतुक आणि अभिनंदन अशा वातावरणात महासभा पार पडली.
महापालिकेची शेवटची महासभा खेळीमेळीने होईल असे अपेक्षित होते. वादग्रस्त वा नियमात न बसणारे विषय टाळले जातील असे वाटत होते. परंतु महामार्गाचे लगत झालेल्या नवीन नाट्यगृह इमारतीला आधी एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देणाऱ्या भाजपाने शिंदे समर्थक नगरसेवकांसह स्वतःच नाव बदलण्याचा ठराव आणला. कलाम यांचे नाव रद्द करून स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव देण्याचा विषय होता. त्याला विरोधी पक्षाने हरकत घेत महासभेत निश्चित झालेल्या नावांना पुन्हा बदलता येणार नाही, असे तुम्हीच आक्षेप घेतले होते याची आठवण करून दिली. त्यावरून खडाजंगी झाली.
शेवटची महासभा असल्याने प्रशासनाच्या वतीने पालिकेत रांगोळी काढण्यात आली होती. तसेच नगरसेवकांचे पुष्प देऊन देऊन स्वागत करण्यात आले. एकमेकांचे तसेच प्रशासनाचे आभार मनात कौतुक आणि अभिनंदनात सायंकाळ झाली. अनेक नगरसेवकांनी आपले अनुभव कथन केले. अनेकांना खूपकाही बोलायचे होते व प्रभागातील मुद्दे मांडायचे होते पण वेळे अभावी अनेकांना बोलणे आवरते घ्यावे लागले. सभागृहात नगरसेवकांनी फोटो काढून घेतले. महापौर ज्योत्सना हसनाळे ह्या बोलताना भावुक झाल्या होत्या.
महापौर ज्योत्सना हसनाळे म्हणाल्या, दोन वर्ष कोरोनात गेली. कोरोनाच्या संकटात पालिकेने खूप चांगले कार्य केले. शहराच्या विकासाची व नागरिकांच्या हिताचे अनेक कामे झाली , चांगले निर्णय झाले. प्रशासना सह सत्ताधारी भाजपा , विरोधी पक्षातील शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी मिळून शहराच्या हिताचा विचार केला. चांगले सहकार्य केले. काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी व्यक्तिगत कोणाचा स्वार्थ वा द्वेष नव्हता.