वाढदिवस साजरा करून परतताना तरुणाचा मृत्यू; खड्ड्यामुळे दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:26 IST2019-11-18T00:25:36+5:302019-11-18T00:26:54+5:30
मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून दुचाकीने घरी परतताना खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल्हेर येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोर घडली.

वाढदिवस साजरा करून परतताना तरुणाचा मृत्यू; खड्ड्यामुळे दुर्घटना
भिवंडी : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून दुचाकीने घरी परतताना खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल्हेर येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोर घडली. पीयूष विजय मिश्रा (रा. मानव कॉम्प्लेक्स, काल्हेर) हे मृताचे नाव आहे.
पीयूष वाढदिवसासाठी मित्रांसोबत ठाण्यातील एका कॅफेमध्ये गेला होता. रात्री उशिरा वाढदिवसाची पार्टी उरकल्यानंतर मित्राचीच दुचाकी घेऊन तो घराकडे निघाला होता. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तो काल्हेर येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोर आला असता, त्याची दुचाकी खड्ड्यात आदळून खाली पडली.
या अपघातात त्याला जबर मार लागल्याने त्याची शुद्ध हरवली. आजूबाजूच्या नागरिकांना अपघाताची माहिती होताच, त्यांनी त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गंभीर मार लागल्याने त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या अपघातप्रकरणी शनिवारी नारपोली पोलीस ठाण्यात मृत पीयूष याच्याविरोधात हयगयीने दुचाकी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहेत.