वेदांतमधील ‘त्या’ चार रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी नाही; चौकशी समितीचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 05:45 IST2021-04-30T05:40:19+5:302021-04-30T05:45:01+5:30
प्रकृती चिंताजनक असल्यानेच मृत्यू : चौकशी समितीचा निष्कर्ष

वेदांतमधील ‘त्या’ चार रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी नाही; चौकशी समितीचा निष्कर्ष
ठाणे : येथील वर्तकनगरमधील वेदांत हॉस्पिटलमध्ये सोमवारी ऑक्सिजनअभावी चार जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपल्या अहवालात त्या चार रुग्णांचा मृत्यू वैद्यकीय हलगर्जीपणा अथवा ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सोमवारच्या घटनेनंतर चौघांचा मृत्यू ऑक्सिजनअभावीच झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केल्याने रुग्णालय प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी करून या प्रकरणात सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले होते.
या समितीने सोमवारी सायंकाळी उशिरा रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार येथे एकूण किती मृत्यू झाले, मृतांची नावे, वय, कोविड आजाराबाबत व रुग्णाच्या आरोग्य विषयक स्थितीची इतर आवश्यक माहिती गोळा करण्यात आली. तसेच मृत्यू एकाच वेळेस झाले की वेगवेगळ्या वेळेत झाले याची माहितीही घेतली गेली, मृत्यूची कारणे, व मृत्यूची वेळ या रुग्णांच्या मृत्यूचा ऑक्सिजनपुरवठ्याशी काही संबंध आहे का, याचीदेखील सविस्तर माहिती घेण्यात आली.
विशेष म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनवर असलेल्या इतर रुग्णांशीदेखील या समितीमधील सदस्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार या चारही रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. तसेच या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असून, प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूची वेळ वेगवेगळी असल्याचेही पाहणीत समोर आले आहे. येथे उपचारार्थ अन्य रुग्ण असून, ऑक्सिजन नसता तर त्यांनादेखील त्याचा फटका बसला असता. परंतु, तसे काहीच निदर्शनास आलेले नाही. त्यामुळेच त्या चार रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.