Death of a newlywed in an accident in Mumbra, ten days of marriage | मुंब्य्रात अपघातात नवविवाहितेचा मृत्यू, दहा दिवसांचा विवाह 

मुंब्य्रात अपघातात नवविवाहितेचा मृत्यू, दहा दिवसांचा विवाह 

- कुमार बडदे
मुंब्रा : 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी' या भावगीतातील काल्पनिक घटना मुंब्य्रात प्रत्यक्षात घडली आहे.
विवाहानंतर दहाव्या दिवशी येथील नेहा चौधरी या नवविवाहितेचा वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात झालेल्या अपघातात शनिवारी मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांपूर्वी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेऊन विवाह (निकाह) करून सुखी संसाराची स्वप्ने रंगवण्यात मग्न असलेल्या तिच्या (अपघातात जखमी झालेल्या) पतीला हातावरची मेंदी सुकण्याआधी ती त्याची साथ सोडून गेल्याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
१५ ऑक्टोबरला कौसा भागातील एमएम व्हॅली परिसरात राहत असलेल्या इरशाद चौधरी याच्याबरोबर तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर १९ तारखेला ते दोघे फिरण्यासाठी महाबळेश्वर येथे गेले होते. तेथून २५ ऑक्टोबरला परत येत असताना ते प्रवास करत असलेल्या कारचा चालक घाटामध्ये एका वाहनाला ओव्हरटेक करत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दुचाकीचालकाला वाचवण्यासाठी त्याने कार उजव्या बाजूला वळवली. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने कारला धडक दिली. यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर आदळून एक हजार फूट खोल दरीत कोसळली. यात नेहाचा घटनास्थळावर मृत्यू झाला. तर, तिचा नवरा इरशाद आणि कारचालक सिराज शेख जखमी झाले. त्यांच्यावर मुंब्य्रातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या अपघातात तिचा मृत्यू झाल्याचा धक्का इरशादला बसू नये, यासाठी तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्याला अद्याप देण्यात आली नसल्याची माहिती मृत तरुणीचा चुलत भाऊ करीम खान यांनी लोकमतला दिली.

Web Title: Death of a newlywed in an accident in Mumbra, ten days of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.