मयत मितेश जगतापच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:42 IST2018-05-02T23:42:49+5:302018-05-02T23:42:49+5:30
जगताप कुटुंबियांवर सातत्याने होणाऱ्या जाचामुळे संशयाची सुई पोलीस यंत्रणेकडे झुकली आहे.

मयत मितेश जगतापच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला
कल्याण : सहा महिन्यांपूर्वी टिटवाळ्यातील मितेश जगताप या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर मयत मितेशने पोलिसी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी करीत दोषीं पोलिसांवर कारवाईसाठी न्याय मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर जगताप कुटुंबियांना सतत तीनदा धमकीचे पत्र आल्याने जगताप कुटुंब भीतीच्या छायेखाली वावरत होते. खटला मागे घेण्यासाठी दबावतंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यातच बुधवारी दुपारी मितेशचे वडील राजेश जगताप आपल्या टिटवाळा येथील घरी आले होते. ते खाली उतरले असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ९ च्या सुमारास घडली. या हल्ल्यात राजेश बचावले आहेत.
जगताप कुटुंबियांवर सातत्याने होणाऱ्या जाचामुळे संशयाची सुई पोलीस यंत्रणेकडे झुकली आहे. दरम्यान राजेश यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी टिटवाळा पोलीस स्थनाकात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..