जिवंत व्यक्तींचे बनवले मृत्यू प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:45 IST2019-01-28T01:04:11+5:302019-01-28T06:45:35+5:30

विमा कंपनीची फसवणूक; टोळीसह दोन डॉक्टरांना अटक, लाखो रुपये हडपले

Death Certificate created by living individuals | जिवंत व्यक्तींचे बनवले मृत्यू प्रमाणपत्र

जिवंत व्यक्तींचे बनवले मृत्यू प्रमाणपत्र

कल्याण : जिवंत व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाणपत्र बनवून त्याआधारे विम्याच्या दाव्याची लाखो रुपये मिळवून तक्रारदारासह विमा कंपनीची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. उल्हासनगर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

चंद्रकांत शिंदे (रा. कल्याण), स्मशानभूमीत काम करणारा तेजपाल मेहरोल, डॉ. अब्दुल सिद्दिकी, डॉ. इम्रान सिद्दिकी, नारायण शिंदे आणि लक्ष्मी शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक मारुती दिघे, पोलीस उपनिरीक्षक शरद पंजे यांच्यासह त्यांच्या पथकाने चंद्रकांत शिंदे (रा. चिंचपाडा) याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरुन ठाणे महापालिका, मुंब्रा विभागातील स्मशानभूमीत काम करणारा तेजपाल मेहरोल (रा. मुंब्रा) याने त्याच्या ओळखीतील डॉ. अब्दुल सिद्दिकी आणि डॉ. इम्रान सिद्दिकी यांच्याकडून दहा जिवंत व्यक्तींचे आणि आंध्र प्रदेश येथे मृत झालेल्या तीन व्यक्तींच्या मृत्यू अहवालावर स्वाक्षरी करून त्याआधारे त्याने ठाणे महापालिका मुंब्रा आरोग्य विभाग येथून मृत्यूचे प्रमाणपत्र काढून शिंदे याला दिले. या खोट्या मृत्यूच्या प्रमाणपत्राद्वारे आरोपींनी विम्याच्या दाव्याचे ८१ लाख रुपये हडप केले.

आरोपींनी जमवली प्रचंड माया
पालिकेच्या मुंब्रा विभागातून बनावट मृत्यू दाखला तयार करून तक्रारदाराची सुमारे चार लाख, तर विमा कंपनीची सहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात १५ जानेवारीला गुन्हा दाखल झाला.
या गुन्ह्याचा तपास कल्याण गुन्हे शाखा करीत होती. तपासादरम्यान आरोपींची साखळी उघडकीस आली. आरोपींनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमवल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Web Title: Death Certificate created by living individuals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू