सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 23:34 IST2025-10-19T23:31:44+5:302025-10-19T23:34:09+5:30
अशोक सराफ यांचे एक खूप गाजलेले नाटक आहे, सारखे छातीत दुखतय, शिवसेनेचे यश पाहून देखील काही लोकांच्या पोटात दुखते असा चिमटा शिंदेंनी विरोधकांना काढला

सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
अंबरनाथ - भाऊबंदकी नावाचे नाटक एकेकाळी फार गाजले होते, मात्र आता मनोमिलन नाटकाचे जोरदार प्रमोशन सुरू झाले आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव आणि राज ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. आम्ही कामाने ' पछाडलेली' लोकं असल्याने आमच्या कामांचा 'धूमधडाका' पाहून विरोधकांचा 'थरथराट' होत असल्याची मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाने अंबरनाथ मध्ये उभ्या राहिलेल्या या नाट्यगृहाच्या निर्मितीमुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या प्रेक्षकांना न जाता आता येथेच दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेता येईल. ज्यांनी या नाट्यगृहाची संकल्पना मांडली, बांधकाम केले. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हे नाट्यगृह साकार करून अंबरनाथच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णपान जोडले गेले असल्याचे सांगितले.
तसेच अशोक सराफ हे नाट्यकलेचे चालते-बोलते विद्यापीठ आहेत. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा योग मला आला. आज इतके दिग्गज कलाकार येथे एकत्र आल्याने जणू काही अंबरनाथमध्ये तारांगणच अवतरले आहे. अशोक सराफ यांचे एक खूप गाजलेले नाटक आहे, सारखे छातीत दुखतय, शिवसेनेचे यश पाहून देखील काही लोकांच्या पोटात दुखते असा चिमटा शिंदेंनी विरोधकांना काढला. मी कोणावर टीका करत नाही पण मी आरोपाला नेहमी कामातून उत्तर दिले असल्याचंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
दरम्यान, अंबरनाथचे रस्ते पूर्वी खड्ड्यांनी भरलेले होते, आज सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत. शूटिंग रेंजपासून अनेक प्रकल्प साकार झाले आहेत. आता हे नाट्यगृह प्रेक्षकांची कलात्मक भूक भागवेल. महाराष्ट्रातील अनेक नाट्यगृह बटाटावड्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अंबरनाथचाही बटाटावडा तितकाच प्रसिद्ध होऊ द्या असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.