जागतिक सासू दिन, एक दिवस सासूचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 04:02 AM2017-10-22T04:02:46+5:302017-10-22T04:02:48+5:30

सासू आणि सून हे नाते आई, बहिण, मावशी किंवा आजी यासारखे जन्मापासून जुळणारे नाते नाही.

The day of the world mother-in-law, one day mother-in-law | जागतिक सासू दिन, एक दिवस सासूचा

जागतिक सासू दिन, एक दिवस सासूचा

Next

- महापौर मीनाक्षी शिंदे
सासू आणि सून हे नाते आई, बहिण, मावशी किंवा आजी यासारखे जन्मापासून जुळणारे नाते नाही. लग्नगाठ बांधली गेल्यावर हे नाते जुळते. सासू-सून या नात्याने अनेक कथा, कादंबºया, नाटक, चित्रपट यांना मसाला पुरवला आहे. सध्या छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये सासू-सून यांची जुगलबंदी तरी पाहायला मिळते किंवा ऋणानुबंध अनुभवायला मिळतात. त्यामुळे हे नाते वजा केले तर आपली करमणूक इंडस्ट्री कोसळून पडेल इतकी ताकद या नातेसंबंधात आहे. ‘जागतिक सासू दिना’निमित्त दोन सूनांनी आपल्या सासवांशी असलेल्या नातेसंबंधांचे उलगडलेले पदर...
आपण आपल्या आई सोबत जसे वागतो तसेच आपण आपल्या सासू सोबत वागलो तर आई-मुलीचे नाते असते तसेच नाते सासु आणि सुनेचे होऊ शकेल. सुदैवाने मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला अगदी आईसारख्या सासुबाई मिळाल्या आहेत. त्यांना तीन मुले असतांनाही त्या आपल्या सुनांना मुलींसारखाच जीव लावतात. त्यामुळेच आज माझ्या नगरसेवक ते महापौरपदापर्यंतच्या प्रवासात त्यांचा माझ्या दृष्टीने खूप मोठा व मोलाचा वाटा आहे.
माझ्या लग्नाला आज २२ वर्षे झाली आहेत. परंतु आजही माझे आणि माझ्या सासूचे नाते दृढ आहे. माझा प्रेमविवाह असल्याने आम्ही लग्नानंतर वेगळे राहू लागलो. परंतु वेगळे राहत असतांना देखील माझ्या आणि सासुच्या नात्यात कधीच कटुता आलेली नाही. उलट त्या आजही माझी आणि माझ्या मुलांची काळजी घेत असतात. आज मी महापौर झाले असले तरी त्याचा जास्तीत जास्त आनंद त्यांना झालेला आहे. किंबहुना त्यांना याचा सार्थ अभिमान वाटतो. नगरसेविका झाल्यापासून कामाचा व्याप वाढलेला आहे. त्यामुळे मुलांकडे कोण बघणार, त्यांचे जेवणाचे काय होणार, याचा विचार मला कधीच करावा लागलेला नाही. कारण माझ्या सासुबाई नेहमीच माझ्या दोन्ही मुलींची काळजी घेत असतात. त्यांना सकाळी नाश्त्यापासून ते शाळेत सोडण्यापर्यंत जवळ जवळ सर्वच कामे त्या करीत असतात. माझी देखील आपल्या मुलीसारखी काळजी त्या करीत असतात. महापौर झाल्यावर माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे जेवणाच्या वेळा आणि घरी जाण्याच्या वेळांमध्ये बदल झाले आहेत. या धावपळीत आपल्या तब्येतीची काळजी घे, असे म्हणणाºया माझ्या सासुबाईच आहेत. मला त्यांच्याकडून आणखी काम करण्याची ऊर्जा आणि प्रोत्साहन नेहमीच मिळत असते. काही दिवसांपूर्वी दगदगीमुळे आजारी पडले तेव्हा त्या रुग्णालयात माझी काळजी घेण्यासाठी दिवस-रात्र हजर होत्या. आपल्या कामाच्या व्यापातून आपल्या मुलांवर संस्कार करणे गरजेचे असते. ते काम मला जमत नाही. परंतु, मी निश्चिंत आहे, कारण मला माझ्या सासुबाईंवर पूर्ण विश्वास आहे. त्या मुलांवर चांगले संस्कार करतील, याची पक्की खात्री आहे. आपल्या मुलांबरोबर, सुनांची आणि नातवंडाची काळजी कशी घ्यावी, त्यांना खायला काय हवे, काय नको, याची सर्वच माहिती त्यांना आहे. शिवाय माझ्या सुखात आणि दु:खात त्या नेहमी माझ्या सोबत सतत असतात.
आता समाज बदलतो आहे, एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येऊन, विभक्त कुटुंबपध्दतीकडे लोकांचा कल राहिला आहे. परंतु माझ्या मते घरात एक तरी ज्येष्ठ व्यक्ती असावी. त्यांच्यामुळे आपल्यावर चांगले संस्कार घडतात. भांडणे कोणाच्या घरी होत नाहीत, घरोघरी मातीची चुली असतातच. परंतु आपण कसे वागावे हे आपल्या हातात असते. आपण जर आपल्या सासुला आईचे स्थान दिले आणि सासुने देखील सुनेला मुलीसारखे मानले तर मला वाटते की, भांड्याला भांडे लागणारच नाही.
- शब्दांकन : अजित मांडके

Web Title: The day of the world mother-in-law, one day mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.