दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 23:12 IST2019-09-03T23:12:09+5:302019-09-03T23:12:55+5:30
कृत्रिम तलावांत विसर्जन : पुढच्या वर्षी लवकर येण्याची घातली साद

दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप
बदलापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बदलापूरकरांनी सोमवारी विघ्नहर्त्या गणरायाला साश्रू नयनांनी निरोप दिला. संध्याकाळी उशिरापर्यंत दीड दिवसांच्या बाप्पाचा विसर्जन सोहळा सुरू होता. यंदा भाविकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाला पसंती दिल्याचे दिसत होते.
बाप्पाला निरोप देण्यासाठी संध्याकाळी ५ वाजल्यापासून भाविकांनी विसर्जनस्थळी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सोहळा सुरू असतो. बदलापुरात उल्हासनदी, गावदेवी तलाव, कात्रप तलाव, वडवली तलाव आदी ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याशिवाय नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा नगर परिषदेच्या वतीने शिरगाव येथे दोन तर उल्हासनदी व कात्रप तलावाजवळ असे चार कृत्रिम तलाव उभारले आहेत. त्याशिवाय नगरसेवक संभाजी शिंदे यांनी त्यांच्या प्रभागात स्वखर्चाने दोन कृत्रिम तलाव तयार केले आहेत. यंदाही भाविकांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाला प्राधान्य दिल्याचे दिसले.