तौत्के वादळ सोमवारी धडकण्याच्या शक्यतेने भाईंदरच्या उत्तन किनारपट्टीवर धोक्याची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 04:54 PM2021-05-16T16:54:04+5:302021-05-16T16:54:42+5:30

समुद्रात घोंगावत असलेले तौक्ते चक्रीवादळाचा भाईंदरच्या उत्तन - पाली - चौक ह्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्याना  फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे

Danger notice on Bhayander's Uttan coast with the possibility of Toutke storm on Monday | तौत्के वादळ सोमवारी धडकण्याच्या शक्यतेने भाईंदरच्या उत्तन किनारपट्टीवर धोक्याची सूचना 

तौत्के वादळ सोमवारी धडकण्याच्या शक्यतेने भाईंदरच्या उत्तन किनारपट्टीवर धोक्याची सूचना 

Next

मीरारोड - समुद्रात घोंगावत असलेले तौक्ते चक्रीवादळाचा भाईंदरच्या उत्तन - पाली - चौक ह्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्याना  फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे . महापालिका ,  पोलीस व महसूल प्रशासन आपत्ती निवारणासाठी सज्ज झाले आहे . तर उत्तनची एक मच्छीमार बोट समुद्रात अडकली आहे . 

समुद्रात  निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ मुळे शनिवार पासूनच ढगाळ पावसाळी  वातावरण आहे . शनिवारी रात्री पाऊस व वाऱ्याने हजेरी लावली . वाऱ्याच्या जोरा मुळे भाईंदर व मीरारोड भागात ३ झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत . उत्तन , पाली व चौक ह्या समुद्र किनारी असलेल्या कोळीवाड्याना वादळाचा तडाखा बसणार अशी शक्यता आहे . वादळी वाऱ्याच्या अनुषंगाने ह्या भागातील झाडांच्या फांद्यांची महापालिकेने छाटणी केली आहे .

 मच्छीमार आणि नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे . समुद्र किनाऱ्यावरच्या मच्छीमारांना घरे रिकामी करून नातलगांच्या घरी तूर्तास आसरा घेण्यास सांगितले आहे . पत्र्याची तुरळक घरे असली तरी त्यांना वादळाने पत्रे उडून जीवित वा वित्त हानी होऊ नये ह्यासाठी खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत .  

अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी प्रशांत कापडे व तलाठी यांनी उत्तन परिसराचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना चालवल्या आहेत . किनारपट्टी वरील तीन चर्चच्या आवारातील सभागृह  केंद्र सुरु करण्यात आली आहेत . महापालिकेने अग्निशमन दलास तैनात केले असून तीन रुग्णवाहिका , अग्निशामक वाहने , जेसीबी तसेच आपत्ती व्यवस्थापनाची वाहने - यंत्र साहित्य सज्ज ठेवले आहे . नागरिकांना हलवण्यासाठी परिवहन सेवेच्या २ बस ठेवण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी सुद्धा नागरिकांना धोक्याच्या सूचना सातत्याने देऊन सतर्क  आवाहन केले आहे . पोलीस पथके सतत गस्त घालत आहेत असे पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी सांगितले . समुद्रात गेलेल्या सर्वच मच्छीमार बोटी किनाऱ्यावर सुरखरूप आल्या असून पाली येथील न्यू हेल्प मेरी हि मच्छीमार बोट मात्र समुद्रात अडकली आहे.

डायमंड मिरांडा यांच्या मच्छीमार बोटीवर त्यांचा मुलगा जस्टिन हा नाखवा असून खलाशी सह एकूण ९ जण बोटीवर आहेत . शनिवारी सकाळी ८ वाजता किनाऱ्यावरील  कुटुंबियांशी जस्टिन यांनी संपर्क केला होता . परंतु त्या नंतर रविवारी दुपार पर्यंत संपर्कच न झाल्याने चिंतेचे वातावरण होते. पोलीस आणि मच्छिमार नेत्यांनी या प्रकरणी तटरक्षक दलास  त्या बोट व त्यावरील ९ जणांचा शोध घेण्याची विनंती करण्यात आली.

त्यानंतर तटरक्षक दलाने समुद्रात बेपत्ता बोटीचा शोध सुरु केला . मात्र रविवारी दुपारी समुद्रातील ओएनजीसीच्या एका बंद रिंग वर बोटीने   घेतल्याचे समजले आणि सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला . बोट रिंग ला बांधून बोटीवरील सर्व ९ जणांना हेलिकॉप्टरने आणण्याचे प्रयत्न चालले होते असे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो म्हणाले. तौक्ते वादळ सोमवारी सकाळी जास्त वेगाने उत्तन भागात धडकण्याची शक्यता आहे . रविवारी रात्री पासूनच वादळाचा तडाखा बसण्याची चिन्हे आहेत . त्यामुळे महसूल , पोलीस व पालिका प्रशासन आधी पासूनच ह्या भागात तैनात झाले आहे. कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Web Title: Danger notice on Bhayander's Uttan coast with the possibility of Toutke storm on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.