‘एका लग्नाची गोष्ट’; ६०० रोपे, ३०० कापडी पिशव्या, ३० हेल्मेटचा केला ‘आहेर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 06:58 IST2020-02-27T23:20:12+5:302020-02-28T06:58:48+5:30
हळदीवरील खर्चाला कात्री

‘एका लग्नाची गोष्ट’; ६०० रोपे, ३०० कापडी पिशव्या, ३० हेल्मेटचा केला ‘आहेर’
- नितीन पंडित
भिवंडी : लग्न म्हटले की, थाटमाट, बडेजाव व अनावश्यक खर्चाची स्पर्धा आली. मात्र, भिवंडी शहरातील श्रीकांत व मानसा यांच्या लग्नात मानसाचा भाऊ विघ्नेश कुसमा याने हळद समारंभ, मंडप सजावट व अन्य अनावश्यक खर्चाला कात्री लावत लग्न सोहळ्यास वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींना तब्बल ६०० वृक्षांची रोपे, ३०० कापडी पिशव्या व ३० हेल्मेट वितरित केले. याखेरीज, दोन गरीब विद्यार्थिनींची वर्षभराची शाळेची फी भरून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
भिवंडी शहरातील पद्मानगर येथील कुसमा कुटुंबातील मानसा हिचा विवाह श्रीकांत याच्यासोबत पद्मशाली समाज हॉल या ठिकाणी बुधवारी आयोजित केला होता. यावेळी वधू मानसाचा भाऊ विघ्नेश याने आपल्या बहिणीच्या लग्नसोहळ्यात सामाजिक भान राखले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे असल्याने सोहळ्याला जमलेल्या ६०० जणांना वृक्षांची रोपटी भेट दिली. प्लास्टिकबंदीनंतरही कापडी पिशव्या वापरण्यात येत नसल्याने ३०० कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक हद्दपार करण्याचा संदेश दिला. रस्त्यावर असंख्य अपघात हेल्मेट न घातल्याने कित्येकांचा मृत्यू होतो. तुम्ही हेल्मेट नियमित वापरले तर अपघातात तुमचा जीव वाचू शकतो, हे बिंबविण्यासाठी ३० हेल्मेट वितरित केल्याची माहिती विघ्नेशने दिली.
फी चा खर्च उचलला
कित्येक मुली गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडतात. हळद समारंभ न करता त्यातून वाचलेले पैसे सत्कारणी लागावे, यासाठी दोन गरीब मुलींच्या शिक्षणाची वर्षभराची फी भरल्याचे त्याने सांगितले. याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.