घर विक्रीच्या आड दाम्पत्याची फसवणूक, घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 22:53 IST2021-10-20T22:52:42+5:302021-10-20T22:53:27+5:30
रिना काटे व त्यांचे पती मंगेश यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये रणजित वालजी सोळंकी रा. नालासोपारा यांची भाईंदरच्या साईबाबा नगर मधील श्री साई गणेश इमारतीतील सदनिका १६ लाखांना खरेदी करण्याचा व्यवहार ठरवला.

घर विक्रीच्या आड दाम्पत्याची फसवणूक, घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल
मीरारोड - घर खरेदीसाठी २ लाख ७० हजार रुपये आगाऊ दिले असताना घर मालकाने मात्र ते स्वतःच्या मुलीच्या नावे करून एका दाम्पत्याची फसवणूक केल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिना काटे व त्यांचे पती मंगेश यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये रणजित वालजी सोळंकी रा. नालासोपारा यांची भाईंदरच्या साईबाबा नगर मधील श्री साई गणेश इमारतीतील सदनिका १६ लाखांना खरेदी करण्याचा व्यवहार ठरवला. तसा करार केला. सोळंकी यांनी स्वतःची तब्येत बारी नसल्याचे सांगत काटे यांच्या कडून सदनिका विक्री पोटीचे २ लाख ७० हजार रुपये आगाऊ घेतले. उर्वरित रक्कम गृहकर्ज मार्फत देण्याचे ठरले.
नंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागल्याने व्यवहार प्रलंबित राहिला. नंतर काटे यांनी सोळंकीला सतत संपर्क साधला असता तो होत नव्हता. त्यामुळे काटे यांनी सोळंकीची मुलगी शीतल हिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी शीतलने माझे वडील दहा वर्षापुर्वीच मयत झाले आहे असे सांगीतल्याने काटे दाम्पत्यास धक्का बसला. त्यांनी सोसायटीच्या सचिवांना भेटून चौकशी केली असता रणजीत सोळंकि याने त्यांची सदनिका शीतलच्या नावे गिफ्टडीड करून दिल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रिना काटे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रणजित सोळंकीवर गुन्हा दाखल केला आहे. नवघर पोलीस अधिक तपास करत आहेत.