कॉर्पोरेट कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:01 IST2018-11-30T00:00:53+5:302018-11-30T00:01:16+5:30
लैंगिक छळवणूक : १ डिसेंबरपर्यंत कोठडी

कॉर्पोरेट कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक
ठाणे : सहकारी महिलेची लैंगिक छळवणूक करून तिला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देणाºया अभिशेषकुमार शर्मा (३८, रा. बाळकुम, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने बुधवारी रात्री अटक केली. त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यात एका नामांकित कंपनीमध्ये हे दोघेही नोकरीला असून शर्मा उच्च पदस्थ अधिकारी आहे. आधी त्यांच्यात चांगली मैत्रीही होती. मात्र, त्याच्या विचित्र वागणुकीमुळे आणि ‘अपेक्षे’मुळे या महिलेने त्याच्याशी मैत्री तोडली होती. तिने पुन्हा पूर्वीप्रमाणेच त्याच्याशी मैत्रीचे संबंध ठेवावेत. यासाठी आपल्या वेगवेगळ्या मोबाइल फोनवरून त्याने तिच्या मोबाइलवर वारंवार फोन केले. तसेच तिच्या मेल आयडी आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज करून तिच्यासह तिचे पती, आई, सासू, सासरे, नणंद आदींना शिवीगाळ केली.
कहर म्हणजे तिच्या पतीलाही ठार मारण्याची धमकी देऊन तिला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. प्रचंड मनस्ताप झाल्याने या महिलेने अखेर कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ करणे, धमकी देणे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे अधिक तपास करत आहेत.