CoronaVirus News: 'त्या' ४३३ मृतदेहांचं काय झालं? ठाण्यातील कोरोना मृतांच्या संख्येवरून मोठा संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 16:13 IST2021-04-13T16:11:35+5:302021-04-13T16:13:32+5:30
कोविड स्मशानभूमीत ४९० मृत्यूंची नोंद; महापालिकेच्या डॅशबोर्डवर मात्र केवळ ५७ मृत्यूंची नोंद

CoronaVirus News: 'त्या' ४३३ मृतदेहांचं काय झालं? ठाण्यातील कोरोना मृतांच्या संख्येवरून मोठा संभ्रम
ठाणे: कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना आता कोरोनाबाधीत मृतांचा आकडादेखील वाढू लागल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षात झालेले मृत्यू आणि महापालिका जाहीर करत असलेली आकडेवारी यात मोठी तफावत असल्याची माहिती समोर आली आहे. कोवीड स्मशानभूमीत मागील ११ दिवसांत अंत्यविधी करण्यात आलेल्या मृतांचा आकडा ४९० च्या घरात आहे. परंतु याच कालावधीत महापालिकेने जाहीर केलेला आकडा हा केवळ ५७ एवढाच असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या आकड्यावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला असून ठाण्यात नेमके किती मृत्यू झाले यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.
निशब्द! ही स्मशानभूमी नव्हे, सरकारी रुग्णालय आहे; फोटो पाहून मन सुन्न होईल
ठाणे महापालिका हद्दीत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मृत्यूची टक्केवारीदेखील वाढली आहे. दररोज स्मशानभूमीमध्ये मृतदेह जाळण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. यापूर्वी पालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू दर हा २ टक्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्यांच्या घरात गेला आहे. परंतु हा आकडा केवळ पालिकेच्या दप्तरी आहे. प्रत्यक्षात महापालिका हद्दीत रोजच्या रोज मृत्यूचा आकडा वाढताना दिसत आहे. स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांशी या संदर्भात चर्चा केली असता, जेव्हापासून शहरात कोरोना वाढत आहे, तेव्हापासून आमच्यावरील ताणदेखील वाढला असल्याचे ते सांगत आहेत.
भीषण! भयंकर!! भयावह!!! दिवस-रात्र जळताहेत मृतदेह, दाहकतेनं शवदाहिन्याही वितळल्या
ठाणे महापालिकेच्या वतीने तीन स्मशानभूमींमध्ये कोविडचे मृतदेह जाळण्यासाठी सुविधा निर्माण केली आहे. यामध्ये मुख्य स्मशानभूमी जवाहरबाग, कळवा येथील स्मशानभूमी तसेच वागळे स्मशानभूमीचा समावेश करण्यात आला आहे. या तीन स्मशानभूमीमध्ये दररोज १४ ते १७ मृत्यूची नोंद होत आहे. यात सर्वाधिक आकडा मुख्य स्मशानभूमीतील आहे. मात्र पालिका प्रशासन जाहीर करत असलेली मृत्यूची आकडेवारी आणि प्रत्यक्षात या तीन स्मशानभूमीत नोंद करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य स्मशानभूमीत मागील ११ दिवसांत २४० मृत्यूंची नोंद रजिस्टरवर झाली आहे. तर कळवा आणि वागळे स्मशानभूमीत अनुक्रमे १०३ आणि १४७ मृत्यूची नोंद झाली असून पालिका प्रशासनाच्या डॅशबोर्डनुसार ही आकडेवारी केवळ ५७ इतकी असल्याने उर्वरीत मृत्यूंच्या संदर्भात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या नोंदीतही घोळ
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या मृत्यूची संख्या जाहीर करण्यात आली असून यामध्ये ठाणे महापालिका हद्दीत एकूण १५११ मृत्यू दाखवण्यात आले आहेत. मात्र ठाणे महापालिकेने त्यांच्या रेकॉर्डनुसार आतापर्यंत १४५७ मृत्य दाखवले असल्याने या आकडेवारीवरूनही घोळ समोर येण्याची शक्यता आहे. यातही तफावत असल्याचेच दिसत आहे. त्यामुळे आकडेवारी लपविली जाते आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर विनामास्क फिरला; रुग्ण तपासले, सामूदायिक नमाजाला गेला
मागील ११ दिवसात ठाणो महापालिकेने जाहीर मृत्यू
तारीख मृत्यू
१ एप्रिल - ५
२ एप्रिल - ३
३ एप्रिल - ५
४ एप्रिल - ५
५ एप्रिल - ५
६ एप्रिल - ४
७ एप्रिल - ५
८ एप्रिल - ७
९ एप्रिल - ६
१० एप्रिल - ५
११ एप्रिल - ७
एकूण - ५७
गेल्या ११ दिवसातील कोविड स्मशानभूमीतील मृत्यूंची नोंद
मनीषा नगर स्मशानभूमी - १०३
मुख्य स्मशान भूमी (जवाहरबाग) - २४०
वागळे स्मशान भूमी - १४७
एकूण - ४९०