CoronaVirus News: निशब्द! ही स्मशानभूमी नव्हे, सरकारी रुग्णालय आहे; फोटो पाहून मन सुन्न होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 03:06 PM2021-04-13T15:06:26+5:302021-04-13T15:12:27+5:30

CoronaVirus News: रुग्णालयात मृतदेहांचा अक्षरश: खच; फोटो पाहून काळजी हेलावून जाईल

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. सर्वाधिक कोरोना बाधितांच्या बाबतीत भारतानं ब्राझीललादेखील मागे टाकलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या आठवड्याभरात देशात दररोज कोरोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मागील ४ दिवसांत तर हा आकडा दीड लाखाच्या पुढे गेला आहे.

महाराष्ट्र, दिल्लीपाठोपाठ आता गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात सध्या अतिशय भीषण परिस्थिती आहे.

डॉ. भीमराव आंबेडकर स्मारक रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचा अक्षरश: खच पडला आहे. स्ट्रेचरपासून जमिनीपर्यंत सर्वत्र कोरोना रुग्णांचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत.

डॉ. आंबेडकर रुग्णालयात सध्या कोरोनाग्रस्तांचे मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. रुग्णालयातलं हे फोटो अक्षरश: अंगावर काटा आणणारे आहेत.

रुग्णालयातलं शवागार पूर्ण भरलं आहे. सध्या रुग्णालयात सर्वत्र कोरोना रुग्णालयांचे मृतदेह दिसत आहेत. जिथे पाहावं तिथे मृतदेह अशी सध्या रुग्णालयातील स्थिती आहे.

रुग्णालयात मरण पावलेल्या रुग्णांचे मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी शवागारात ठेवले जात आहेत. मृतांची संख्या मोठी असल्यानं शवागार पूर्ण भरलं आहे.

रुग्णालयातील आयसीयू आणि ऑक्सिजन बेड्स आधीच पूर्ण भरले आहेत. त्यामुळे शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयातील आरोग्य यंत्रणाच व्हेटिंलेटरवर असल्याचं चित्र दिसत आहे.

सुरुवातीला रुग्णालयात दररोज कोरोनामुळे १-२ जणांचा मृत्यू व्हायचा. मात्र आता दररोज १० ते २० कोरोना रुग्ण दगावत आहेत. इतके मृतदेह ठेवण्याची व्यवस्था रुग्णालयाकडे नाही. त्यामुळे परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.