CoronaVirus in Thane: 'त्या' कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 19:26 IST2020-03-28T19:24:48+5:302020-03-28T19:26:08+5:30
Coronavirus ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ वर

CoronaVirus in Thane: 'त्या' कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
ठाणे: कोरोनाचे आज आणखी चार रुग्ण आढळले असून कळवा, पारसिक नगर भागातील ज्या इसमाला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्या समवेत ९ जणांना कस्तुरबाला हलवण्यात आले होते. त्यातील चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरीत पाच जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असले तरी त्यांन कस्तुरबा रुग्णालयात देखरेखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.
आतापर्यंत १८८६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ५५ जणांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यातील ३० जणांना सोडण्यात आले असून उर्वरीत २५ जण देखरेखाली आहेत. पहिला रुग्ण ठाण्यात आढळून आल्यानंतर कळवा पारसिक नगर भागातील ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर ९ सदस्यांना पालिकेच्या आरोग्य विभागाने कस्तुरबा रुग्णालयात पाठवले होते. त्यातील चार जणांचे रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. परंतु त्यांनाही देखरेखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ९ झाली आहे.
दरम्यान आतापर्यंत पालिकेच्या माध्यमातून २८ मार्चपर्यंत १८८६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९५४ नागरिक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ९३२ जणांचा त्यात समावेश आहे. तर आतापर्यंत १८२९ जणांना घरीच देखरेखाली ठेवण्यात आले आहे. तर ५५ जणांना कस्तुरबाला पाठविण्यात आले होते. त्यातील ३० जणांना तपासणी करुन घरी सोडण्यात आले आहे. तर उर्वरीत २५ जणांवर उपचार सुरु आहेत. तर पालिकेने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात 10 संशयितांना देखरेखाली ठेवण्यात आले आहे.