Coronavirus News: कोरोनामुळे ठाण्यातील कुटूंबावर दुहेरी संकट: कॉरंटाईन झाल्याचा फायदा घेत घरातून लांबविला लाखोंचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:34 IST2020-07-16T17:29:28+5:302020-07-16T17:34:09+5:30
कोरोनाची लागण झाल्यामुळे घरातील इतरांनाही कॉरंटाईन करण्यात आले. याचाच फायदा घेत नौपाडयातील एका घराचे कुलूप तोडून चोरटयांनी एक लाख ८९ हजारांचा ऐवज चोरल्याची घटना नुकतीच घडली आहे

अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कुटूंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे घरातील इतरांनाही कॉरंटाईन करण्यात आले. याचाच फायदा घेत नौपाडयातील एका घराचे कुलूप तोडून चोरटयांनी एक लाख ८९ हजारांचा ऐवज चोरल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी बुधवारी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदनवाडी रायगड गल्ली भागातील एका कुटूंबातील महिलेला ३ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर महापालिकेने या परिवारातील इतरांना देखील हाजूरी येथील विलगीकरण केंद्रामध्ये कॉरंटाईन केले होते. त्यामुळे या कुटूंबियांचे घर ३ ते १५ जुलै या काळात बंदच होते. दरम्यानच्याच काळात दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरकाव करुन चोरटयांनी काही रोकड, सोन्या आणि चांदीचे दागिने असा घरातील एक लाख ८९ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात कुटूंबियांनी १५ जुलै रोजी चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
* ठाण्यात सध्या कोरोनामुळे अनेक घरांमध्ये घरातील एक सदस्य जर रुग्णालयात दाखल असेल तर अन्य कुटूंबियांना कॉरंटाईन केले जाते. ज्यांना घरात कॉरंटाईन केले असेल, तिथे चोरीची समस्या उद्धभवत नाही. पण, ज्यांना केंद्रामध्ये कॉरंटाईन केले, त्याठिकाणी जर अशा चोरीच्या घटना घडत असतील तर नागरिकांनी कशाच्या आधारावर कॉरंटाईन सेंटरमध्ये जायचे, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. पालिका आणि पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज ठाणे परिसरातून व्यक्त होत आहे.