CoronaVirus Lockdown : सलून व्यवसायावर गदा, आता महिनाभर केस-दाढी घरातच, मिनी लाॅकडाऊनचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 23:55 IST2021-04-10T23:54:31+5:302021-04-10T23:55:00+5:30
CoronaVirus Lockdown : पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात ५०० सलून असून, शहरी भागात २,१०० सलून आहेत. यात मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात.

CoronaVirus Lockdown : सलून व्यवसायावर गदा, आता महिनाभर केस-दाढी घरातच, मिनी लाॅकडाऊनचा फटका
- सुनील घरत
पारोळ : पूर्वी पारंपरिक पद्धतीने होत असलेल्या सलून व्यवसायाने आता कात टाकली आहे. मात्र, ‘हातावर पोट’ अशीच या व्यवसायाची ओळख असून, कोरोनामुळे निर्बंधाचे लागलेले ग्रहण सुटत नसल्याने आता आम्ही पोट कसे भरायचे? असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर आहे. असेच निर्बंध राहिल्यास यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालत ३० तारखेपर्यंत सलून बंद राहणार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे आता नागरिकांना घरातच महिनाभर केस, दाढी करावी लागणार आहे.
पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात ५०० सलून असून, शहरी भागात २,१०० सलून आहेत. यात मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. या सलून व्यवसायावर या कामगारांची चूल पेटते, पण आज हजारो कामगारांचा रोजगार बुडाला आहे. मागील वर्षी लाॅकडाऊनमध्ये हा व्यवसाय सहा महिने बंद होता. यात सर्वात शेवटी सलून व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती. लॉकडाऊनमध्ये या व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. यात कर्जाचा भार सहन न झाल्याने, महाराष्ट्रात २१ व्यावसायिकांनी आत्महत्या केली होती, पण सरकारने या व्यावसायिकांसाठी बंद काळात कोणत्याच प्रकारे मदत न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हा व्यवसाय अगदी दोन-तीन महिन्यांपूर्वीच अटी-नियम पाळून सुरू झाला होता, मात्र पुन्हा महिनाभर बंद करण्याची वेळ आल्याने त्यांच्यासमोर आता जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
बंद असल्याने कसा भागवायचा खर्च?
शहरातील, तसेच ग्रामीण भागातील बहुतांश दुकाने भाड्याच्या गाळ्यात असून, त्यांना महिन्याला भाडे भरावे लागते. यात जागा मालक सूट देत नाही. व्यवसाय बंद असल्याने भाडे कसे भरायचे, हा प्रश्न आहे. त्यात वीजबिल, पाणीपट्टी यासाठीही पैसा लागणार आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित होतो. व्यवसाय बंद असल्याने साहित्यही वाया जाते. असाच जर आमचा धंदा बंद राहिला, तर पुढे हा व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्न आहे.
वेळेचे बंधन घालण्यात व आठवड्यातून दोन दिवस लॉकडाऊन करण्यास आमचा विरोध नाही, पण महिनाभर दुकान बंद करून कर्जाचा भार सहन करणे आम्हाला अशक्य आहे.
- सत्यवान सापणे, सलून व्यावसायिक
सलून बंद असेल, तर कामगार व त्याचे कुटुंब जगणार कसे, याचा विचार शासनाने केला नाही. आता या निर्णयामुळे आमचे जगणे कठीण झाले आहे. यात शासनाने विचार करावा.
- संतोष साने, सलून व्यावसायिक
लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने कोणतीही मदत त्यांना दिली नाही. यामुळे अनेकांनी आत्महत्याही केल्या, पण आता पुन्हा हा व्यवसाय बंद करण्याचा आदेश असल्याने आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
- मयूर जाधव, सरचिटणीस, राष्ट्रीय नाभिक संघटना