coronavirus: Covid Care Center at Bhiwandi Mosque, excellent example of social harmony | coronavirus: भिवंडीतील मशिदीत कोविड केअर सेंटर, सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण

coronavirus: भिवंडीतील मशिदीत कोविड केअर सेंटर, सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण

ठळक मुद्देभिवंडीत बाधितांची संख्या १३०० हून अधिक आहे. अनेकांना उपचारासाठी भिवंडीबाहेर जावं लागतंय. भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.

मुंबई : विविधतेत एकता जपणाऱ्या, जोपासणाऱ्या आपल्या देशात अनेक धर्म, पंथांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. संकटसमयी मदतीला धावणं ही शिकवण प्रत्येक धर्म देतो. सध्याच्या कोरोना काळात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी गरजूंच्या मदतीसाठी आपली दारं उघडली आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.

भिवंडीत बाधितांची संख्या १३०० हून अधिक आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी भिवंडीबाहेर जावं लागतंय. हे चित्र पाहून, शांतीनगर भागातील जमात-ए-इस्लामीच्या मक्का मशिदीत कोविड केअर सेंटर तयार करण्यात आलं आहे. येथे कुठल्याही धर्माच्या रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन नि:शुल्क उपलब्ध करून दिला जातोय. महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याचं हे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.

ज्या रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाही, त्यांना या कोविड केंद्रात दाखल करून घेतो. ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास त्यांना २ ते ४ तास ऑक्सिजन सपोर्ट दिला जातो. त्यानंतर बरं वाटू लागल्यास आणि रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्यास ते तिथे जाऊन उपचार घेतात, अशी माहिती जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष मौलाना औसफ फलानी आणि विश्वस्त शेख रियाझ ताहीर यांनी दिली.

याआधी, पुण्यात आझम कॅम्पस परिसरातील मशिदीचा एक मजला आयसोलेशन व क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यात आला आहे. तिथे ८० बेड्सची व्यवस्था आहे. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आणि सर्वात मोठ्या जामा मशिदमध्ये १५० व्यक्तींना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था आहे.

शेगावमध्ये ‘आनंद विसावा’

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण हे लक्षात घेत, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानकडूनही ५०० खाटांचा कक्ष क्वारंटाइन कक्ष म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे. आनंद विसावा या प्रशस्त कक्षात कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी क्वारंटीन असलेल्या लोकांना संस्थानकडून दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात संस्थानकडून दररोज दोन हजार भोजन पाकिटांचे वितरणही करण्यात येत होते.

दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट ने कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबांना अन्नधान्न्याची किट उपलब्ध करून दिली, तसेच अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरेही आयोजित केली.

कोल्हापूरातील करवीर निवासिनी अंबाबाई पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोरोना काळात दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील गरीब फेरीवाले, जोतिबा मंदिर परिसरातील गरीब दुकानदार, नाभिक समाज, तृतीयपंथी, वारांगणा, चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ, ऑर्केस्ट्रातील कलावंत यांना धान्याचे किट वाटप केले आहे. रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना धान्यांचे किट वाटप करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने कोरोनाचा फटका बसलेल्या हजारो लोकांना जेवण आणि अन्नधान्य, अशी मदत केली आहे. भिक्षू, भटके, हातावर ज्यांचे पोट आहेत, अशा अनेकांना मठाकडून मदत पोहोचविली गेली. कोल्हापूर पोलीस दलाला रोज मठाच्या वतीने जेवण पुरवण्यात येत आहे. गोंदवलेकर महाराज संस्थाननेही भरीव आर्थिक मदत आणि धान्यवाटप करून गरजूंना आधार दिला.

कोल्हापूरातील वाईल्डर मेमोरियल चर्चतर्फे कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती.

चर्चने उघडली शाळेची इमारत

माहिम येथील हिंदुजा रुग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वास्तव्य करता यावे म्हणून सेंट मायकल चर्चने शाळेच्या इमारतीतील खोल्यांचं घरांमध्ये रूपांतर केलं होतं. या केंद्रामध्ये पन्नासहून अधिक नर्स आणि कर्मचारी तब्बल ६ आठवडे वास्तव्य करत होते. यांच्या व्यतिरिक्त पोलिसांच्या वास्तव्याची देखील येथे व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, वांद्रे येथील सेंट पीटर्स चर्चने देखील स्थलांतरित कामगारांच्या राहण्यासाठीची व्यवस्था केली होती.

(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)

English summary :
Covid Care Center at Bhiwandi Mosque, excellent example of social harmony

Web Title: coronavirus: Covid Care Center at Bhiwandi Mosque, excellent example of social harmony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.