Corona Vaccine : मीरा भाईंदरमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी एकच लसीकरण केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 20:26 IST2021-05-01T20:25:39+5:302021-05-01T20:26:56+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : महापालिकेकडे पुरेशी लस नसल्याने तूर्तास तरी एकाच केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे.

Corona Vaccine : मीरा भाईंदरमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी एकच लसीकरण केंद्र
मीरारोड - केंद्र शासनाने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले जाणार अशी घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात लसींचा साठाच पुरेसा नसल्याने मीरा भाईंदर मध्ये केवळ पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातच सदर वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्यां करीता लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ . अंजली पाटील म्हणाल्या कि, पालिकेस ३ हजार लसींचा पुरवठा झालेला आहे. सदर लस ७ दिवस पुरवायची आहे. त्यामुळे केवळ ३०० लोकांनाच रोज लस दिली जाणार आहे. सध्या भाईंदरच्या भारतरत्न भीमसेन जोशी रुग्णालयातच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. आजपासून लसीकरण सदर केंद्रावर सुरू झाले असून केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जात आहे. महापालिकेच्या अन्य लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षांपासूनच्या वरील नागरिकांना लस दिली जात असून तेथे सुद्धा प्रत्येक लसीकरण केंद्रावर रोज ३०० इतकेच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.
एकूणच महापालिकेकडे पुरेशी लस नसल्याने तूर्तास तरी एकाच केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. त्यासाठी नोंदणी आणि बुकिंग ऑनलाईन झाल्या शिवाय लस दिली जाणार नाही आहे. कारण लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळण्याची शक्यता असल्याने टप्प्या टप्प्याने लसीकरण केंद्र वाढवली जाणार आहेत. पालिकेची एकूण १२ तर खासगी ९ लसीकरण केंद्र आहेत. पालिकेने आणखी २७ नवीन लसीकरण केंद्रांना मंजुरी मिळावी यासाठीच प्रस्ताव पाठवले आहेत.