Corona Vaccination: ठाणे, पालघरमध्ये लसींचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 00:54 IST2021-04-10T00:53:31+5:302021-04-10T00:54:15+5:30
ठाणे शहरात दोन दिवस लसीकरण बंद : तिन्ही जिल्ह्यांत ४१,२०० लसींचाच साठा

Corona Vaccination: ठाणे, पालघरमध्ये लसींचा तुटवडा
ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा अपुरा पडू लागला आहे. काही ठिकाणची केंद्रे बंद करून काही ठिकाणी त्यांची संख्या कमी केली आहे. ठाण्यात तर वीकेण्ड लॉकडाऊनचे कारण देऊन दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वास्तविक, ठाणे महापालिकेकडेदेखील अगदी तुरळक लसींचा साठा आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यासह रायगड आणि पालघरसाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा अवघा ४१ हजार २०० लसींचा साठा शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. असे असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागासह काही महापालिकांच्या ठिकाणी लसींचा साठा जवळजवळ संपला आहे.
ठाण्यासह रायगड आणि पालघर जिल्ह्यांत सध्या लसींचा अपुरा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यासह या जिल्ह्यांनीदेखील लसींचा साठा मिळावा यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे; परंतु अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता ठाण्यासह या दोन जिल्ह्यांतही लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. पालघर जिल्ह्यासह वसई-विरार महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे अवघा एक हजार ८४० डोस शिल्लक आहेत. येथे कोविशिल्डचा साठा शिल्लक नाही, तर रायगड जिल्ह्यातही कोव्हॅक्सिनचे तीन हजार ६८० आणि कोविशिल्डन्या १०० लसींचा साठा उपलब्ध आहे. भिवंडीत कोविशिल्डचे ८०० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे दोन हजार ६५० आणि कोविशिल्डचे ३० डोस शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे सहा हजार ७२० डोस असून, कोविशिल्डचा साठा संपुष्टात आला आहे, तर मीरा-भाईंदरमध्ये कोव्हॅक्सिनचे पाच हजार ५८० डोस शिल्लक आहेत, नवी मुंबईतही कोव्हॅक्सिनचे पंधरा हजार डोस शिल्लक आहेत, तर उल्हासनगरमध्ये कोविशिल्डचे एक हजार १२० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे येथील अनेक केंद्रे बंद केली आहेत, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसींचा साठा संपल्याने लसीकरणाला ब्रेक लागला आहे.
ठाण्यात नागरिकांनी धरली घराची वाट
ठाणे महापालिकेने वीकेण्ड लॉकडाऊनचे कारण देऊन दोन दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही रुग्णालयांनी शुक्रवारी ५० जणांचेच लसीकरण केले जाईल, असे स्पष्ट करून तसे फलक लावले होते, तर पालिकेद्वारे सुरू असलेल्या केंद्रावर लसीकरण कमी प्रमाणात झाल्याचे दिसत होते, तर काही केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी झाली हाेती. अनेक नागरिकांना तर घराची वाट धरावी लागली.