युद्धपातळीवर काम सुरू ठेवा, खड्डे बुजवण्यासाठी पालकमंत्री रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 16:59 IST2018-07-14T16:58:29+5:302018-07-14T16:59:24+5:30
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत पडलेले खड्डे बुजवण्यासाठी शनिवारी स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना खड्डे बुजविण्यासंदर्भात आदेशही दिले.

युद्धपातळीवर काम सुरू ठेवा, खड्डे बुजवण्यासाठी पालकमंत्री रस्त्यावर
ठाणे - सततच्या पावसामुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत पडलेले खड्डे बुजवण्यासाठी शनिवारी स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरले. खड्ड्यांमुळे लोकांचा जीव जात असून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा शिंदे यांनी दिला. हद्द कोणाची हे न बघता युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे आदेश त्यांनी महापालिका, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी प्रशासनाला दिले.
रस्त्यावरील खड्डे कायमस्वरुपी बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग ठाणे महापालिका करत आहे. तर खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत उच्च दर्जाचे पॉवर ब्लॉक आणि आरएमसीने खड्डे बुजवण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि शीव-पनवेल महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामांची पाहणी शिंदे यांनी शनिवारी केली. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांत खड्ड्यांमुळे अपघात होऊन ५ बळी गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिंदे यांनी युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह या कामांची पाहणी केली. खड्डे बुजवण्याच्या कामात ढिसाळपणा खपवून घेणार नाही, पावसाचे कारण सांगू नका, हद्दीचे कारण सांगू नका, अशी सक्त ताकीदच त्यांनी दिली.
ठाण्यात कोपरी पुल आणि कॅसल मिल नाका येथे आधुनिक तंत्रज्ञान प्रायोगिक तत्वावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून त्याची पाहणी शिंदे यांनी केली. याप्रसंगी खा.राजन विचारे, खा.डॉ.श्रीकांत शिंदे, महापालिका अतिरिक्त आयुक्त संजीव उन्हाळे आदी उपस्थित होते. कोपरी पुल येथील खड्डे बुजवण्यासाठी नेहमीच्या खडी-डांबर ऐवजी पॉलिमर आणि सिमेंटचा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहतुकीला अडथळा न येता अल्पावधीत काम करता येते. कॅसल मिल नाका येथे रेझिन तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवण्यात येत आहेत.