राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ ठाण्यात काँग्रेसची निदर्शने
By सुरेश लोखंडे | Updated: March 25, 2023 15:14 IST2023-03-25T15:14:11+5:302023-03-25T15:14:49+5:30
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसने हे आंदोलन छेडले.

राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ ठाण्यात काँग्रेसची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सुरत न्यायालयाने काँग्रेसचे राष्टीय नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची सजा सुनावल्यानंतर त्वरित हालचाल करत केंद्रातील भा.ज.पा.सरकारने राहुल त्यांची संसद सदस्यपाचे निलंबन केल्याच्या आरोपाखाली ठाण्यातील काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अन्यायी निलंबनाविरोधात निषेध व्यक्त करीत धरणे आंदोलन आज छेडले.
येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसने हे आंदोलन छेडले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात व भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व ठाणे काँग्रेस प्रभारी संतोष केणे यांच्यासह शेकडो पदाधिकार्यांचा सहभाग होता.
या प्रसंगी बोलताना शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण म्हणाले की राहुल गांधी यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध व्यक्त करीत आहोत. लोकशाही प्रधान देशाला हुकुमशाहीकडे नेण्याचे काम भाजपा व मोदी सरकार करित असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अधिक ताकदीने रस्त्यावर उतरून सरकारविरोधात लढा उभारणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ता सचिन शिंदे यांनी स्पष्ट केले.