शिंदेसेनेच्या शायना एनसी सह भाजपाच्या १३ जणांवर काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैन यांनी ठोकला १०० कोटींचा मानहानीचा दावा
By धीरज परब | Updated: August 14, 2025 00:11 IST2025-08-14T00:09:58+5:302025-08-14T00:11:28+5:30
विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नरेंद्र मेहता व काँग्रेसचे मुझफ्फर हुसैन यांच्यात लढत होती.

शिंदेसेनेच्या शायना एनसी सह भाजपाच्या १३ जणांवर काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैन यांनी ठोकला १०० कोटींचा मानहानीचा दावा
मिरारोड - गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदर मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसैन यांचे बॉम्ब स्फोटातील आरोपीं सोबत संबंध असल्याचा खोटा प्रचार समाज माध्यमांवर करून बदनामी केल्या प्रकरणी तत्कालीन भाजपा नेत्या व सध्या शिंदेसेनेत असलेल्या शायना एनसी सह भाजपाच्या एकूण १३ जणां विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा मुझफ्फर हुसैन यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नरेंद्र मेहता व काँग्रेसचे मुझफ्फर हुसैन यांच्यात लढत होती.
निवडणूक प्रचार दरम्यान बॉम्ब स्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याची फाशी माफ करण्या संदर्भात मर्सी पिटीशन वरती मुझफ्फर हुसैन यांची सही असल्याचे बनावट पिटीशन पत्र बनवून आतंकवादीचे स्टिकर लावून त्या शेजारी हुसैन यांचा फोटो लावून समाज माध्यमांवर पोस्ट व शेअर केले होते.
काँग्रेस नेते व उमेदवार हुसैन हे निवडणुकीत निवडून येऊ नये म्हणून त्यांचे आतंकवाद्यांशी संबंध व ते त्यांना वाचवण्यासाठी सहकार्य असल्याचे भासवण्यात आले. हुसैन यांच्या विरुद्ध लोकांमध्ये भ्रम, द्वेष व धार्मिक तेढ निर्माण करून त्यांची प्रतिमा मलीन केली गेली.
त्यावेळी सदरचे खोटे मेसेज समाज माध्यमांवर प्रसारित केल्या प्रकरणी भाजपाचे जेरोम डिसूजा, कुणाल शुक्ला, गणेश मुरुगन सह आमची मुंबई इन्स्टा पेज, दि फिटिंग फाईटस पेज विरुद्ध मीरारोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम नुसार ऍड. राहुल राय यांच्या मार्फत गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर अन्य आरोपींचा पण गुन्ह्यात समाविष्ट करण्यासाठी तक्रार देण्यात आली होती.
तसेच निवडणूक जिंकण्यासाठी हुसैन यांचे खोटे बदनामीकारक संदेश व पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्या नंतर देखील भाजपच्या अनेकांनी हुसैन पराभूत व्हावेत म्हणून जाणीवपूर्वक बदनामी कारक संदेश व्हायरल केले होते.
मुझफ्फर हुसैन पराभूत व्हावेत आणि भाजपा उमेदवार निवडणून यावेत म्हणून त्यांची प्रतिमा विधानसभा निवडणुकीत मलीन केल्याबद्दल तत्कालीन भाजप नेत्या व विद्यमान शिंदेसेना प्रवक्त्या शायना एन. सी., भाजपाचे माजी नगरसेवक दिनेश तेजराज जैन, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते जोरावरसिंह गोहील, प्रियेश शाह, नितीन बी. पांडे, महेश चव्हाण, शैलेश लालजी पांडे, कुणाल शुक्ला, जेरोम डिसोजा, गणेश के मुरुगन, ऍड. अविनाश रघुनाथ सूर्यवंशी सह बीफायटिंग फॅक्टस्, आमची मुंबई इन्स्टा पेज व इतर यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला असल्याचे ऍड. राहुल राय यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैन, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचीन सावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत आदी उपस्थित होते.
निवडणूक जिंकण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन भाजपाने कटकारस्थाने करून दहशतवाद्यांचा वापर देखील केला.
भ्रष्टाचार सह अनेक गंभीर गुन्हे व घोटाळे केलेल्या भाजपा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेस व काँग्रेस उमेदवार मुझफ्फर हुसैन यांची खोटा प्रचार करून जनमानसात बदनामी केल्याचा आरोप यावेळी प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केला.