ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान, राहुल गांधींना टाटा बाय बाय करून आ. संजय केळकर भाजपमध्ये
By अजित मांडके | Updated: March 16, 2024 16:19 IST2024-03-16T16:17:40+5:302024-03-16T16:19:53+5:30
राहुल गांधींना टाटा बाय बाय करून आ. संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखली व उपस्थितीत शेकडो काँग्रेसी भाजपमध्ये.

ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान, राहुल गांधींना टाटा बाय बाय करून आ. संजय केळकर भाजपमध्ये
अजित मांडके ,ठाणे : कॉंग्रसेची भारत जोडो यात्रा ठाण्यात आली असता ठाणे जिल्ह्यातील शेकडो काँग्रेसीनी राहुल गांधींना टाटा ...बाय बाय करून भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखली व उपस्थितीत, शनिवारी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार बी.के.भगत यांचे सुपूत्र काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या मुंब्रा, रेतीबंदर भागातील शेकडो कार्यकर्त्या समवेत भाजपमध्ये जाहिर प्रवेश केला.
याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मा.नगरसेवक नारायण पवार, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप स्लम सेल अध्यक्ष कृष्णा भूजबळ, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, कैलास म्हात्रे, कुणाल पाटील आदी उपस्थित होते. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाणे जिल्ह्यात येत असताना काँग्रेस मध्ये अंतर्गत वाद उफाळला होता. दुसरीकडे आता राहुल गांधीच्या आगमनाचा मुहूर्त साधून ठाणे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने ठाण्यात उरली सुरली कॉंग्रेस देखील आता रसातळाला जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल भगत यांनी, त्यांच्या शेकडो कार्यकर्त्या समवेत भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी त्यांच्यासह कॉग्रेस शहर सरचिटणीस संजय शिंदे, प्रदेश काँग्रेस ओबीसी कोकण विभाग सरचिटणीस सुधीर जाब्रे, वार्ड अध्यक्ष सुशांत कांबळे, मनोज प्रजापती आदींसह इतर कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
यावेळी बोलतांना केळकर यांनी, अनिल भगत हे चळवळीतील नेते आहेत. राहूल गांधी ठाण्यात असताना त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींचे काम बघून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आता भाजपमध्ये येत आहेत. एक प्रकारे केंद्र सरकारच्या कामाचीच ही पावती असल्याचे ते म्हणाले.