बाहेरगावच्या प्रवाशांनी वाढवली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:41 AM2021-04-01T04:41:14+5:302021-04-01T04:41:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण हे रेल्वेचे जंक्शन आहे. तसेच रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असे केंद्रस्थान आहे. त्यामुळे ...

Concerns raised by out-of-town commuters | बाहेरगावच्या प्रवाशांनी वाढवली चिंता

बाहेरगावच्या प्रवाशांनी वाढवली चिंता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण हे रेल्वेचे जंक्शन आहे. तसेच रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असे केंद्रस्थान आहे. त्यामुळे शहरात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीद्वारे बाहेरगावाहून येणारी प्रवासीसंख्या जास्त आहे. साहजिकच, बाहेरगावाहून येणाऱ्यांमुळे शहरात कोरोना पसरण्याची दाट शक्यता आहे. रेल्वेचे जंक्शन आणि कल्याण एसटी डेपो ही प्रमुख सार्वजनिक प्रवासी स्थानके असली, तरी शहरात खाजगी टॅक्सी वाहतूक, बस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. खाजगी बसगाड्या अंतर्गत जिल्ह्यासह अन्य राज्यांतून प्रवास करतात. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत टिटवाळा, आंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी, डोंबिवली, कोपर, अप्पर कोपर, ठाकुर्ली, दिवा-पनवेल मार्गावरील दातिवली, निळजे ही रेल्वेस्थानके येतात. या रेल्वे स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी त्याचबरोबर डोंबिवली बसस्थानकातून प्रवास करणारे प्रवासी यांची एकूण संख्या लाखोंच्या घरात आहे. कल्याण रेल्वे आणि बस डेपोत प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात असली, तरी खाजगी वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात नाही. त्याचबरोबर चेकनाके आणि शहराच्या हद्दीवर कोरोना चाचणी केली जात नाही.

-----------

रेल्वे

कल्याण रेल्वेस्थानकात तीन शिफ्टमध्ये कोरोना चाचणी केंद्र चालविले जाते. त्याठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये २०० प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. एकूण ६०० प्रवाशांची कोरोना चाचणी तीन शिफ्टमध्ये केली जाते. बाहेरगावच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता चाचणीचे प्रमाण व्यस्त आहे. उपनगरीय आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांद्वारे दिवसाला तीन लाख प्रवासी प्रवास करतात.

------------

बस डेपो

कल्याण बस डेपोमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. अन्य वेळेत कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे त्या वेळेत परगावांहून शहरात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. चार तासांत केवळ १०० प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. दिवसाला १० हजार प्रवासी डेपोतून प्रवास करतात.

--------------

ट्रॅव्हल्स

शहरातून खाजगी बस चालवल्या जातात. राज्यात व राज्याबाहेर या बस चालतात. त्यातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. टॅक्सी कॅब चालतात. त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही कोरोना चाचणी केली जात नाही.

---------------

बाहेरगावांतून येणाऱ्यांची चाचणी मोजक्याच जागी

कल्याण रेल्वेस्थानक व कल्याण बस डेपो येथे बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. मात्र, दिवा-वसई आणि दिवा-पनवेल मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. तसेच विठ्ठलवाडी बस डेपो आणि डोंबिवली बसस्थानकात कोरोना चाचणी केली जात नाही. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील आणि अन्य राज्यांतून शेतमाल घेऊन येणारे टेम्पो, ट्रकचालक व शेतमाल विक्रेते शेतकरी यांची कोरोना चाचणी केली जात नाही. रस्ते वाहतुकीद्वारे शहरात अनेक एण्ट्री पॉइंट आहेत. त्याठिकाणी चाचणी केली जात नाही.

------------

कल्याण रेल्वेस्थानक आणि बस डेपोत बाहेरगावांतून आलेल्या प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर घेऊन कोरोना चाचणी केली जाते. मात्र, त्यापैकी किती प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होते, याचा तपशील प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्या गावातून कल्याण-डोंबिवलीत कोरोना दाखल होतो, हे सुस्पष्ट नाही. मात्र यूपी, बिहारमधून जास्त प्रवासी कल्याण, डोंबिवलीत येतात. त्याचबरोबर आंतरराज्य अहमदनगर, नाशिक, धुळे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, पुणे या ठिकाणांहून सरकारी व खाजगी बसने प्रवासी जास्त कल्याणच्या दिशेने प्रवास करतात.

-------------

पॉइंटर्स

एकूण कोरोना रुग्ण- ७८ हजार २८७

बरे झालेले रुग्ण- ६८ हजार ६३८

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण- ८ हजार ४२७

होम क्वारंटाइन झालेले एकूण रुग्ण- ४६ हजार ५९७

एकूण बळी- १ हजार २२२

------------------------

वाचली

Web Title: Concerns raised by out-of-town commuters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.