‘त्या’ मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई द्या, उच्च न्यायालयाचे ठाणे पालिकेला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:42 AM2020-05-21T03:42:15+5:302020-05-21T03:42:30+5:30

लवादाने टीएमटीला मुलाच्या पालकांना २२ लाख रुपये अर्ज केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला.

Compensate the parents of 'that' child, High Court orders Thane Municipality | ‘त्या’ मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई द्या, उच्च न्यायालयाचे ठाणे पालिकेला आदेश

‘त्या’ मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई द्या, उच्च न्यायालयाचे ठाणे पालिकेला आदेश

Next

मुंबई : बस अपघातात मृत्यू पावलेल्या किशोरवयीन मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई देण्याचा वाहन अपघात लवादाचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने त्या पालकांना अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याचा आदेश ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाला (टीएमटी) दिले.
लवादाने टीएमटीला मुलाच्या पालकांना २२ लाख रुपये अर्ज केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला. त्याला टीएमटीच्या व्यवस्थापकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे या अपिलावरील निर्णय मंगळवारी दिला.
५ डिसेंबर २०१४ रोजी दहावीत शिकत असलेला ध्रुव ठक्कर हा मुलुंड पूर्वेला असलेल्या ज्ञान सरिता उच्च माध्यमिक शाळेसमोरून टीएमटीची बस पकडत होता. तेवढ्यात वाहकाने बसची बेल वाजवली. त्यांनतर बस सुरू झाली आणि ध्रुव बसच्या दारातून खाली पडून आला. त्याचा पाय चिरडला गेला. दोन रुग्णालयांतून त्याला हलविण्यात आले आणि १३ फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला.
टीएमटीने लवादाच्या निर्णयाला आव्हान देत म्हटले की, बस थांबण्यापूर्वीच ध्रुव बसमध्ये चढला. तसेच पालकांनी दिलेले बिल अवाजवी असल्याने नुकसानभरपाई मिळणार नाही, असे टीएमटीच्या वकिलांनी सांगितले. तर ध्रुवच्या पालकांच्यावतीने निखिल मेहता यांनी सांगितले की, वाहकाने मान्य केले आहे की, ध्रुव बसमध्ये चढत असल्याचे त्याने पाहिले नाही तर चालकाने उलट तपासणीत मान्य केले की त्याने अपघात पहिला नाही. रुग्णालयांची बिले लवादापुढे सादर केली. उलट लवादाने त्यात अतिरिक्त नुकसानभरपाई दिली पाहिजे.

वार्षिक ८ टक्के व्याज
अर्जदाराने व प्रतिवाद्याने सादर केलेली सर्व कागदपत्रे व तोंडी पुरावे विचारात घेत लवादाने स्पष्ट केले की, ध्रुव बस चढत असताना वाहकाने पाहिले नाही आणि बसची बेल वाजवल्याने चालकाने बस पुढे नेली. त्या दोघांच्या दुर्लक्षामुळे ध्रुवला अपघात झाला, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. लवादाने योग्य निर्णय दिल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने लवादाने दिलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ केली. उच्च न्यायालयाने टीएमटीला २६ लाख रुपये नुकसान भरपाई अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला.

Web Title: Compensate the parents of 'that' child, High Court orders Thane Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे