शिंदेसेना, उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी; ठाण्यात आनंद आश्रमाबाहेर तुंबळ घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 05:24 IST2025-03-03T05:23:05+5:302025-03-03T05:24:31+5:30
टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला संजय राऊत यांनी घातलेला हार शिंदेसेनेने काढून त्याठिकाणी पुतळ्याला दुग्धाभिषेक केल्याने हा वाद उफाळला.

शिंदेसेना, उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी; ठाण्यात आनंद आश्रमाबाहेर तुंबळ घोषणाबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येथील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमाबाहेर शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी राडा झाला. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. या ठिकाणी आधीच मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.
टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला खा. संजय राऊत यांनी घातलेला हार शिंदेसेनेने काढून त्याठिकाणी पुतळ्याला दुग्धाभिषेक केल्याने हा वाद उफाळला. दिघे यांना घातलेला हार काढून तो पायदळी तुडविणे म्हणजे हा त्यांचा अपमान असल्याचा आराेपही राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
काय घडले ?
मेळाव्यापूर्वी दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली आनंद आश्रमाजवळ आली असता आश्रमाबाहेर उभ्या असलेल्या शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही सेनेकडून कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करीत होते. त्यावेळी काहींनी या नेत्यांना आश्रमात जाण्यासही अटकाव केला. खा. राऊत यांनी आश्रमाजवळील दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
उद्धवसेनेचे नेते निघून गेल्यावर शिंदेसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. त्यावर शिंदेसेनेच्या महिला जिल्हासंघटक मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, अपवित्र लोकांनी पाया पडणे ही वाईट गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही हा भाग धुतला आहे. आमच्या महिला आघाडीने त्यांना उत्तर दिले आहे.