नालेसफाईसाठी जुंपले बालमजूर!
By Admin | Updated: June 2, 2016 01:21 IST2016-06-02T01:21:22+5:302016-06-02T01:21:22+5:30
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम हे पालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होणे अपेक्षित आहे. मात्र, अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांचे नालेसफाईकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे

नालेसफाईसाठी जुंपले बालमजूर!
अंबरनाथ : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम हे पालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होणे अपेक्षित आहे. मात्र, अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांचे नालेसफाईकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच नालेसफाईचे काम करणारा कंत्राटदार हा बालमजुरांचा वापर करत आहे. अवघे १०० ते १५० रुपये देऊन त्यांच्याकडून दिवसभर काम करून घेत आहे. कंत्राटदाराच्या या प्रवृत्तीकडे पालिका अधिकारी मात्र दुर्लक्ष करत आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेने नालेसफाईसाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. त्यातील १५ लाखांचे काम हे यंत्राद्वारे नालेसफाईसाठी वापरण्यात येत आहे. तर, उर्वरित १० लाख खाजगी कामगारांकडूनकाम करून घेण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. कामगारांकडून नालेसफाईचे काम करताना कामगारांना सुरक्षेची साधने पुरवण्याची जबाबदारीही कंत्राटदाराची आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार हे कामगारांना कोणतीच साधने पुरवत नाहीत. ग्लोजविना हाताने गाळ काढण्याचे काम करत आहेत. या कामगारांसोबत अनेक ठिकाणी कंत्राटदाराने बालकामगारांचा वापर सुरू केला आहे. खुंटवली गावदेवी मंदिराच्या मागील बाजूस नालेसफाई करण्यासाठी १० ते १२ बालकामगारांचा वापर केला. एवढेच नव्हे तर या कामगारांना अल्प मजुरी देण्यात येत आहे. अवघी १५ ते १७ वर्षांची मुले नाल्यात उतरून काम करत असतानाही या प्रकाराची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला नाही. मुळात या कामावर पालिका अधिकाऱ्यांची कोणतीच देखरेख नसल्याचे समोर येत आहे. कंत्राटदार करेल ते काम अंतिम मानण्याची सोयच अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून ठेवली आहे. शहरात अनेक ठिकाणी बालकामगारांकडून नालेसफाईचे काम करून घेण्यात येत आहे.
यासंदर्भात आरोग्य विभागाचे अधिकारी सुरेश पाटील यांना कल्पना दिल्यावर त्यांनीदेखील या प्रकरणी आश्चर्य व्यक्त केले. तसेच कंत्राटदाराला तत्काळ बोलवून घेत बालकामगारांचा वापर थांबवण्यास सांगितले.
अधिकारी म्हणून त्यांनी लागलीच आदेश दिले असले तरी त्या कंत्राटदारावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)